"नेत्याचा अपमान सहन नाही झाला पाहिजे, कामरावर कारवाई करा, पण..."; अनिल परबांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:40 IST2025-03-24T13:33:58+5:302025-03-24T13:40:01+5:30
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी कुणाल कामरावर कारवाईची मागणी केली आहे.

"नेत्याचा अपमान सहन नाही झाला पाहिजे, कामरावर कारवाई करा, पण..."; अनिल परबांची भूमिका
Anil Parab on Kunal Kamra Controversy: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडबंनात्मक गाण्यातून टीका केल्याने स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा वादात सापडला आहे. शिवसेना शिंदे गट कुणाल कामराविरोधात आक्रमक झाला आहे. मात्र कुणाल कामराने केलेल्या टीकेवरून ठाकरे गटात वेगवेगळी मतं असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे यांनी कुणाल कामराच्या टीकेचे कौतुक केलं आहे. तर अनिल परब यांनी मात्र कुणाल कामरावर कारवाई झाली पाहिजे असं म्हटलं. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्याप्रमाणेच कुणाल कामरावर वेगाने कारवाई करा असंही अनिल परब म्हणाले.
"प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केला तेव्हा त्यांच्या घरावर कोणी हल्ला केला नाही. म्हणजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान मान्य आहे का आणि माजी उपमुख्यमंत्र्यांचा अपमान मान्य नाही. कुणाल कामराने जर काही चुकीचं केलं असेल तर त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायलाच हवी. तसंच कोरटकर आणि सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यांच्या बाबतीत कोणी काही बोलत नाही. त्यांच्या घरावर कोणी गेलेलं नाही," असं अनिल परब म्हणाले.
"ज्यांनी स्टुडिओवर हल्ला केला त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. छत्रपती शिवरायांचे शिवरायांचा अपमान करणाऱ्यांनाही तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे. कारवाया सगळ्यांवर करा. कोरटकर आणि सोलापूरकरांना मोकळं सोडू नका. जशी कामारावर कारवाई केली जाईल तशी त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे," असंही अनिल परब म्हणाले.
"आपल्या पक्षाच्या नेत्याचा अपमान सहन नाही झाला पाहिजे. नेत्याचा अभिमान असलाच पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पण अभिमान असायला पाहिजे. कोरटकर आणि सोलापूरकर यांना का पाठीशी घातलं जातंय. त्यांच्या घरावरती हे शिवसैनिक का जात नाहीये. नागपूरच्या दंगलीत नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मग तुम्ही कुणाल कामराच्या स्टुडिओची नुकसान भरपाई देणार आहात का. त्यामुळे सगळ्यांना न्याय सारखा असला पाहिजे आणि सगळ्यांवर कारवाई झालीच पाहिजे," अशी मागणी अनिल परब यांनी केली.