"ठाकरेंनी मला नव्हे तर मराठी माणसाला शिवी दिली"; 'चाटम' उल्लेखाने मुंबई भाजपा अध्यक्ष संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 18:43 IST2026-01-04T18:42:44+5:302026-01-04T18:43:21+5:30
मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षात ३ लाख कोटींचा घोटाळा झाला आहे असंही अमित साटम यांनी म्हटलं.

"ठाकरेंनी मला नव्हे तर मराठी माणसाला शिवी दिली"; 'चाटम' उल्लेखाने मुंबई भाजपा अध्यक्ष संतापले
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्तपणे शिवशक्तीचा वचननामा आज प्रकाशित केला. यावेळी उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी अमित साटम यांच्याकडून होत असलेल्या टीकेवर प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी चाटम, चाटम असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांची ही टीका मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या जिव्हारी लागली. त्यानंतर लगेच त्यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत पत्रकार परिषद घेतली. त्यात ठाकरेंनी मला नव्हे तर मराठी माणसाला शिवी दिली असा घणाघात त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मला शिवी दिली नाही तर मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी माणसाला शिवी घातली आहे. मी कुठल्या मोठ्या कुटुंबातून येत नाही. माझे आडनाव मोठे आहे म्हणून मी इथं तुमच्यासमोर बसलो नाही. त्यामुळे कुणाच्या पुण्याईवर मी इथे बसलो नाही. उद्धव ठाकरे यांनी मला शिवी घातली नाही तर या मुंबईतल्या गरीब आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवी घातली आहे. प्रत्येक कोकणी माणसाला शिवी घातली आहे. मी मालवणी आहे, त्यामुळे प्रत्येक मालवणी माणसाला ही शिवी घातली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नेमकं काय घडले?
मुंबईतील शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धवसेना-मनसे-राष्ट्रवादी शरद पवार गटाचा संयुक्त वचननामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी पत्रकाराने अमित साटम यांच्या ममदानी यांच्या आरोपावरून उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावेळी कोण चाटम, चाटम असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी साटम यांच्या आरोपांवर भाष्य केले. भाजपाने मुद्द्यांवर बोलले पाहिजे आणि आम्ही मुद्द्यांवर बोलतो. ममदानीबद्दल त्यांनी मोदींना विचारले पाहिजे कारण ते नवाज शरीफांचा केक खाऊन आले होते. मोदी तिकडे जात येत असतात. आम्ही जात नसतो. त्याचा आणि मुंबईचा काही संबंध नाही. त्यामुळे मुद्द्यांवर बोला असं ठाकरेंनी म्हटलं होते. मात्र चाटम उल्लेखावरून अमित साटम चांगलेच संतापले.
ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप
दरम्यान, अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मुंबईत ५० हजार कोटींपेक्षा जास्त इमारतीच्या प्रस्तावांचा घोटाळा आहे. के ईस्ट, के वेस्ट यातून ३६७३ फाईली उद्धव ठाकरेंची सत्ता महापालिकेत असताना गहाळ झाल्या आहेत. त्यात प्रत्येक फाईलमध्ये १० कोटींचा घोटाळा आहे. त्यात अग्निशमनचाही घोटाळा आहे. त्यामुळे फक्त बिल्डिंग घोटाळा हा ५० हजार कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांनी उंदीरही सोडले नाही. मेट्रोला स्थगिती दिल्यामुळे १० हजार कोटींचा खर्च वाढला, त्याचा फटका मुंबईकरांना भोगावा लागत आहे. मविआ काळात १०० कोटींच्या वसुलीचा घोटाळा समोर आला होता. मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षात ३ लाख कोटींचा घोटाळा झाला आहे असंही अमित साटम यांनी म्हटलं.