Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 06:42 IST

आम्ही सांगू त्याच जागा तुम्हाला मिळतील, अशी भूमिका उद्धवसेना, मनसेच्या नेत्यांनी घेतल्याने महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचे चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप संपलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीतील जागा वाटपात उद्धवसेना व मनसेचे पदाधिकारी अवास्तव हस्तक्षेप करू लागल्याची भावना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष व काँग्रेसचे नेते व्यक्त करीत आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत १३ माजी नगरसेवक असतानाही तीन माजी नगरसेवक गाठीशी असलेली उद्धवसेना व एकही माजी नगरसेवक नसलेली मनसे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या कळव्यातील जागांवर दावा करीत आहेत. ३० जागांची मागणी करणाऱ्या काँग्रेसला केवळ पाच जागांवर तडजोड करण्याकरिता ठाकरे बंधूंची युती दबाव टाकत आहे.

आम्ही सांगू त्याच जागा तुम्हाला मिळतील, अशी भूमिका उद्धवसेना, मनसेच्या नेत्यांनी घेतल्याने महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचे चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप संपलेले नाही. ठाण्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असतानाही त्यांनाही समाधानकारक जागा मिळत नसल्याने पक्षात अस्वस्थता आहे.ठाण्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. जागा वाटपावर एकमत झालेले नाही. बुधवारी रात्री आ. आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धवसेनेचे राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे शहरप्रमुख रवी मोरे, राष्ट्रवादी (शरद पवार)चे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते.

उद्धवसेनेने ५० ते ५५ जागांवर दावा कायम. मनसेला ३० ते ३२ जागा हव्या.आव्हाडांच्या पक्षाला कळवा, मुंब्रा आणि राबोडीत जागा हव्या.लोकसभेला मुस्लीम मतदारांची साथ लाभलेल्या उद्धवसेनेने राबोडीतील जागेवर दावा केल्याची सूत्रांची माहिती. 

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने राबोडीतील जागा आपल्याकडेच राखली. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने शहरातील काही भागातील जागा मागितल्या. उद्धवसेना आणि मनसेने त्याचा इन्कार केला. काँग्रेसने २५ ते ३० जागांची अपेक्षा केली असताना त्यांना केवळ पाच जागाच दिल्या जातील, असा सूर आहे. काँग्रेसने यावर नाराजी व्यक्त केली. तुम्हाला १० जागा हव्या असल्यास तुमचे निवडून येणारे उमेदवार दाखवा, त्यांचा सर्व्हे दाखवा मग जागा देऊ, अशी भूमिका ठाकरे बंधूंनी घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Brothers' alliance strains Maha Vikas Aghadi seat-sharing talks.

Web Summary : Thackeray brothers' alliance causes tension in Maha Vikas Aghadi seat sharing. Uddhav Sena and MNS demand more seats, pressuring Congress to accept fewer. NCP also feels marginalized.
टॅग्स :उद्धव ठाकरेराज ठाकरेमनसेराष्ट्रवादी काँग्रेसमुंबई महापालिका निवडणूक २०२६महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६ठाणे महापालिका निवडणूक २०२६