मुंबई महापौरपदावरून महायुतीत रस्सीखेच; दिल्लीत चर्चा; अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 07:33 IST2026-01-22T07:33:14+5:302026-01-22T07:33:48+5:30

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिंदेसेनेचे सरचिटणीस, माजी खा. राहुल शेवाळे यांच्यात दिल्लीत चर्चा सुरू आहे.

Tensions in the Mahayuti over the post of Mumbai Mayor; Discussions in Delhi; Two and a half years formula ahead | मुंबई महापौरपदावरून महायुतीत रस्सीखेच; दिल्लीत चर्चा; अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला पुढे

मुंबई महापौरपदावरून महायुतीत रस्सीखेच; दिल्लीत चर्चा; अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला पुढे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिकेत सर्वाधिक ८९ जागी विजय मिळविलेल्या भाजपने महापौरपदावरील दावा कायम ठेवला असून, २९ नगरसेवकांच्या जोरावर शिंदेसेना महापौरपदासाठी आग्रही असून, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ही मागणी मान्य करावी, अशी अपेक्षा शिंदेसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिंदेसेनेचे सरचिटणीस, माजी खा. राहुल शेवाळे यांच्यात दिल्लीत चर्चा सुरू आहे.

शिंदेसेनेने महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला पुढे ठेवला असून, पहिल्या अडीच वर्षांसाठी शिंदेसेनेचा महापौर असावा, अशी मागणी केली आहे. येत्या २३ जानेवारीपासून  बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होत असल्याने, या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मुंबईचा पहिला महापौर शिंदेसेनेचाच असावा, असा आग्रह शेवाळे यांनी धरला आहे.

भाजपचा दावा काय?

भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने महापौरपदाबाबत तडजोड न करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने महापौरपद नैसर्गिकरीत्या भाजपलाच मिळावे, असा पक्षाचा दावा आहे.

शिंदेसेनेला काय देणार?

भाजपकडून शिंदेसेनेला स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य व शिक्षण समित्यांमध्ये जबाबदारी देण्याची तयारी असल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत, २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि ३१ जानेवारीला महापौर निवडणूक होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार)ला पक्ष कार्यालय नाही

  • मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार प्रत्येक पक्षाच्या गटाला महापालिकेत पक्ष कार्यालय मिळणार आहे. मात्र, आवश्यक नगरसेवकांचे संख्याबळ नसल्याने राष्ट्रवादी (शरद पवार)ला या पक्षाला कार्यालय मिळणार नाही. एखाद्या पक्षाला किंवा गटाला पक्ष कार्यालय देण्यासाठी किमान सहा नगरसेवकांचा गट असणे आवश्यक आहे पण, राष्ट्रवादी (शरद पवार)चा एकच नगरसेवक निवडून आल्यामुळे त्या पक्षाला कार्यालय मिळणार नाही. 
  • काही नगरसेवक हे अपक्ष म्हणून निवडून आलेले असतात. त्यांनी आपला अपक्ष म्हणून वेगळा गट स्थापन केला तर या गटालाही दालन देण्याची तरतूद आहे. माजी नगरसेवक मनोज संसारे यांनीही अपक्षांचा गट स्थापन करून कार्यालय मिळवले होते, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. किमान सहा नगरसेवकांचा गट कार्यालय मिळवण्यासाठी आवश्यक आहे, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.
  • राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षाचे अजितराव राणे हे एकमेव विजयी आहेत. त्यांना अपक्षांच्या गटातही सामील होता येणार नाही. २०१७ मधील निवडणुकीत एमआयएम पक्षाचे दोनच नगरसेवक निवडून आले होते, त्यांनाही कार्यालय मिळाले नव्हते. सहा नगरसेवक निवडून आल्यामुळे मनसेचा कार्यालयावरचा दावा अबाधित राहिला आहे.

Web Title : मुंबई महापौर पद को लेकर महायुति में रस्साकशी; ढाई-ढाई साल का फार्मूला आगे

Web Summary : मुंबई के महापौर पद के लिए भाजपा और शिंदे सेना में खींचतान है। शिंदे सेना बालासाहेब ठाकरे की जन्म शताब्दी के सम्मान में 2.5 साल का फार्मूला प्रस्तावित करती है। भाजपा बहुमत के कारण अपने दावे पर जोर देती है, शिंदे सेना को समितियां प्रदान करती है। अपर्याप्त पार्षदों के कारण एनसीपी कार्यालय से चूक सकती है।

Web Title : Mahayuti Tug-of-War Over Mumbai Mayor Post; Formula for Two-and-a-Half Years.

Web Summary : BJP and Shinde Sena vie for Mumbai's mayoralty. Shinde Sena proposes a 2.5-year formula honoring Balasaheb Thackeray's birth centenary. BJP insists on its claim due to majority seats, offering committees to Shinde Sena. NCP may miss office due to insufficient corporators.