"मंदिरंसुद्धा उदरनिर्वाहाचं साधन, ती उघडावीत ही आमचीसुद्धा भावना, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 15:36 IST2020-08-30T15:21:10+5:302020-08-30T15:36:50+5:30
देवांनी असं बंदिवान होऊन मंदिरात थांबावं, असं आम्हालाही वाटत नाही, असंहीसुद्धा संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

"मंदिरंसुद्धा उदरनिर्वाहाचं साधन, ती उघडावीत ही आमचीसुद्धा भावना, पण..."
मुंबई- भाजपानं काल शिवसेनेच्या विरोधात घंटानाद आंदोलन केलं होतं. त्याच आंदोलनाला आज संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. . भाजपानं काल घंटा वाजवली असेल, पण घंटा वाजवण्याआधीच ही सगळी वेदना आमच्या कानापर्यंत आणि हृदयात पोहोचलेली आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. मंदिरं बंद करावीत, संपूर्ण लॉकडाऊन करावं हा निर्णय केंद्राचा होता. मंदिर उघडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा काय परिणाम झाला हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. आम्हीसुद्धा देवभक्त आहोत. देवांनी असं बंदिवान होऊन मंदिरात थांबावं, असं आम्हालाही वाटत नाही, असंहीसुद्धा संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असं करावंसं वाटणार नाही. हे संकट माणसानं आणलेलं नाही, ही देवाची करणी आहे. देवासाठी आम्ही झगडतोय, आम्हालाही वाटतं मंदिरं उघडावीत. मंदिरांचं सुद्धा एक अर्थकारण आहे. मंदिरांवरसुद्धा लाखो कुटुंब जगतायत. देवळात पूजारी असले तरी प्रसादापासून हार, फुलं आणि नारळ अशा अनेक गोष्टींचा पुरवठा होत असतो. मंदिरांच्या बाहेर जे हार-फुलांचे स्टॉल असतात त्यांची आर्थिक उलाढाल थांबली आहे हे आम्हालाही माहीत आहे. या भूतलावरचं प्रत्येक क्षेत्र हे उदरनिर्वाहाचं साधन आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी काँग्रेसच्या अंतर्गत विषयावर भाष्य केलं आहे. सत्तेत असला तर सत्तेत, सत्तेत नसल्यास विरोधी पक्षात उभं राहिलं पाहिजे. दुर्दैवानं आज ती स्थिती दिसत नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत, टीव्ही ९ मराठीकडे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्ष हा त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर झालेला दिसतोय. त्याची मलाही वेदना आहे. मी त्या विचाराचा नसलो तरी देशाच्या राजकारणात प्रमुख पक्ष टिकले पाहिजेत. तरच या देशाची संसदीय लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकू शकते, असंसुद्धा संजय राऊत म्हणाले आहेत. मधल्या काळात २३ नेत्यांनी जे काही सोनिया गांधींना पत्र पाठवलं, त्यावरचा वाद अजून क्षमलेला नाही. त्यातून काँग्रेस पक्ष जास्त खिळखिळा होतोय की काय, अशी मला भीती वाटतेय. त्या २३ नेत्यांची मागणी योग्य आहे. काँग्रेसला योग्य नेतृत्व मिळावं, यासाठी राहुल गांधींनी पुढाकार घ्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.