Join us

ग्रेट ! महाराष्ट्राची मान उंचावणारं काम, आशिष शेलारांकडून चक्क ठाकरेंचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 14:28 IST

महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या आशिष शेलार यांनी आपली मैत्री जपत उद्धव ठाकरेंच्या सुपुत्रांच्या कामाचे कौतुक केलंय.

ठळक मुद्देत्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! ग्रेट!,'' असे म्हणत शेलार यांनी तेजस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. 

मुंबई - ठाकरे सरकारवर सातत्याने ट्विटरच्या माध्यमांतून टीका करणारे भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज चक्क ठाकरेंचं कौतुक करणारं ट्विट केलंय. मात्र, हे कौतुक ठाकरे सरकारचं नसून ठाकरे कुटुंबातील एका सदस्याचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे लहान चिरंजीव तेजस ठाकरेंच्या संशोधनाचं कौतुक करत, महाराष्ट्राची मान उंचावरणारं काम तेजस यांनी केल्याचं अॅड. आशिष शेलार यांनी म्हटलंय. 

महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या आशिष शेलार यांनी आपली मैत्री जपत उद्धव ठाकरेंच्या सुपुत्रांच्या कामाचे कौतुक केलंय. ''जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले..त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी "हिरण्यकेशी"प्रजाती शोधली. त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! ग्रेट!,'' असे म्हणत शेलार यांनी तेजस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. 

तेजस ठाकरेंना राजकारणात अजिबात इंटरेस्ट नसून त्यांना पाण्यातील जीवसृष्टींचा अभ्यास आणि संशोधन करण्यात रस आहे. त्यातूनच ते नवनवीन संशोधन करत असतात. यापूर्वी त्यांनी खेकडा व पालीच्या प्रजातींचा शोध लावला आहे. तर, आता माशाची नवीन प्रजाती तेजस यांनी शोधली आहे. आंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणारी ही प्रजाती आहे. 

आंबोलीतील हिरण्यकेशी नदीपात्रातून गोड्या पाण्यातील स्चिस्टुरा हिरण्यकेशी या माशाची नवीन प्रजात डॉ. प्रवीणराज जयसिम्हण, शंकर बालसुब्रमण्यम, तेजस ठाकरे या संशोधकांनी संशोधनाअंती जगासमोर आणली आहे. याबाबत अ‍ॅक्वा इंटरनॅशनल जर्नल आॅफ इचिथॉलॉजी मध्ये संशोधनपर प्रबंध प्रकाशित झाला आहे. आंबोली हे गाव पश्चिम घाटामध्ये जैवविविधतने अतिशय संपन्न आहे. विविध प्रकारचे बेडूक, साप, पक्षी, फुलपाखरे, वनस्पती यांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाअंती जगाच्या समोर आली आहे. यातील काही प्रजाती तर जगाच्या पाठीवर केवळ आंबोलीमध्ये सापडतात; त्यामध्येच आणखी एक म्हणजे या गोड्या पाण्यातील माशाची भर पडली आहे.

माशाची नोंद कुठेही नाही

गेली काही महिने मी या विषयावर मत्स्यछायाचित्रे टिपणारे शंकर बालसुब्रह्मण्यम् आणि तरुण आणि समर्पित मत्स्यवैज्ञानिक डॉ. प्रवीणराज जयसिम्हण यांच्यासोबत काम करीत आहे. प्राचीन हिरण्यकश्यपू मंदिराच्या आवारात असलेल्या नैसर्गिक कुंडात हा अनोखा मासा आढळला. सुवर्णकेशसंभाराला संस्कृतमध्ये ‘हिरण्यकेशी’ म्हटले जाते. पूर्ण वाढीच्या माशामध्ये हा सुवर्णरंग दिसतो; म्हणून या माशाला या नदीचे नाव दिल्याचे तेजस यांनी म्हटले आहे. अद्याप या माशाची नोंद इतरत्र कुठेही आढळून आलेली नाही. सुवर्ण केशसंभार व हिरण्यकेशी नदीपात्रात सापडल्याने या माशाला या नदीच्याच नावावरून हे ‘स्चिस्टुरा हिरण्यकेशी’ असे नामकरण करण्यात आले आहे.

खेकड्याला ठाकरे नाव

तेजस यांनी यापूर्वी खेकड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावला असून हा खेकडा ‘ठाकरे’ यांच्याच नावानं ओळखला जात आहे. लाल-जांभळ्या व भगव्या रंगाच्या या खेकड्याला ‘ग्युबर्नेटोरियन ठाकरे’ असं नाव देण्यात आलं होतं. तेजस हे कला शाखेचे विद्यार्थी असून वन आणि वन्यजीवांच्या अभ्यासाची आवड आहे. याच आवडीतून त्याची विविध ठिकाणी भ्रमंती सुरू असते. कोकणातील जंगलात दुर्मिळ सापांच्या जाती शोध घेण्यासाठी गेलेल्या तेजसला सावंतवाडीजवळच्या रघुवीर घाटावर असलेल्या धबधब्यात खेकड्यांच्या पाच नव्या जाती सापडल्या आहेत.

टॅग्स :आशीष शेलारउद्धव ठाकरेट्विटर