शिक्षकांना युआयडी स्टिकर चिटकविण्याच्या कामातून वगळले; मुंबईतील ४ हजार रनर शिक्षकांना मोठा दिलासा
By सीमा महांगडे | Updated: March 3, 2023 18:32 IST2023-03-03T18:31:26+5:302023-03-03T18:32:12+5:30
शिक्षकांना युआयडी स्टिकर चिटकविण्याच्या कामातून वगळण्यात आले आहे.

शिक्षकांना युआयडी स्टिकर चिटकविण्याच्या कामातून वगळले; मुंबईतील ४ हजार रनर शिक्षकांना मोठा दिलासा
मुंबई : दहावी बारावीच्या परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना युआयडी स्टिकर चितकविण्याचे काम देण्यात येऊ नये असे लेखी आदेश आज एसएससी बोर्डाने सर्व मुख्य परीक्षा केंद्रांना दिले आहे. याबाबत मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी एसएससी बोर्डाकडे तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत आज मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने शिक्षकांना या कामातून वगळण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे मुंबई ठाणे व पालघर तसेच नवी मुंबईतील रनर चे काम करणाऱ्या जवळपास ४ हजार शिक्षकांना दिलासा मिळाला असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
पेपर शाळांमध्ये पोहोचवण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा आहे. यात प्रत्येक विभागातील एक प्रमुख शाळा ही प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी केंद्र म्हणून नेमली जाते. येथून सर्व प्रश्नपत्रिका 'रनर'च्या माध्यमातून संबंधित विभागांतील शाळांमध्ये पोहोचवल्या जातात हे रनर शिक्षक असतात. राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असून ही परीक्षा सुरळीत चालण्यासाठी मागील काही वर्षांपासून शिक्षकांना रनर म्हणून नियुक्त केले जाते. मुख्य केंद्रातून प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहचविणे त्यासह उत्तरपत्रिका परिराक्षक कार्यालयात पोहचविणे हे काम रनर करीत असतो. त्यात या कामांसोबतच या शिक्षकांना केंद्रावर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर युआयडी स्टिकर चिटकविण्याचे काम देत असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी अनिल बोरनारे यांच्याकडे केल्या होत्य. याबाबत बोरनारे यांनी वाशी येथील शिक्षण मंडळ कार्यालयात मंडळाचे सचिव डॉ सुभाष बोरसे यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आज बोर्डाने शिक्षकांनी ही कामे देऊ नये असे आदेश काढले आहे.