Join us

३६० रुपयांचा टी-शर्ट पडला लाखाला; महिलेला आॅनलाइन गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 06:01 IST

दहिसर पूर्वेकडील परिसरात सीमा वाघेला (३५) या कुटुंबीयांसोबत राहतात. मुलाने त्यांच्या मोबाइलवरून १० आॅक्टोबर रोजी क्लब फॅक्टरी

मनीषा म्हात्रे

मुंबई : दिवाळीनिमित्त मुलाने क्लब फॅक्टरी अ‍ॅपवरून ३६० रुपयांचे टी-शर्ट खरेदी केले. मात्र टी-शर्ट व्यवस्थित न बसल्याने त्यांनी अ‍ॅपवर रिफंडबाबत तक्रार केली. मात्र, पैसे रिफंड करण्याच्या नावाखाली त्यांच्या खात्यातून लाख रुपये गायब केल्याने दहिसरच्या एका कुटुंबाला दिवाळीची आॅनलाइन खरेदी भलतीच महागात पडली आहे. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

दहिसर पूर्वेकडील परिसरात सीमा वाघेला (३५) या कुटुंबीयांसोबत राहतात. मुलाने त्यांच्या मोबाइलवरून १० आॅक्टोबर रोजी क्लब फॅक्टरी या अ‍ॅपवरून ३६० रुपयांचे टी-शर्ट आॅर्डर केले. बुधवारी टी-शर्टची डिलिव्हरी आल्यानंतर त्यांनी पैसे दिले. मुलाने टी-शर्ट घालून बघितला. मात्र त्याला तो बसला नाही. याबाबत त्यांनी अ‍ॅपवरून टी-शर्ट बदली करण्याबाबत माहिती घेतली. तेथून मिळालेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा क्लब फॅक्टरीमधून बोलत असल्याचे सांगून, टी-शर्ट परत करत पैसे हवे असल्यास त्यासाठी १५ दिवसांचा अवधी लागणार असल्याचे सांगितले. पुढे डेबिट अथवा क्रेडिट कार्डची माहिती दिल्यास पैसे लगेच परत करतो, असे सांगितले. त्यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याने दुसऱ्या क्रमांकावरून फोन केला. त्यांनी डेबिट कार्डची सर्व माहिती त्याला दिली. त्याने २४ तासांत पैसे परत मिळतील, असे सांगून फोन ठेवला.

सव्वाचारच्या सुमारास मोबाइलवर आलेल्या संदेशामुळे त्यांची तारांबळ उडाली. पैसे तर रिफंड झाले नाहीतच, मात्र सुरुवातीला ४० हजार, २५ हजार, २० हजार असे करत एक लाख रुपये त्यांच्या खात्यातून काढण्यात आले. अवघ्या १९ मिनिटांत ही रक्कम काढण्यात आली. या प्रकारामुळे सीमा यांचा गोंधळ उडाला. लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच खात्यातून एक लाख रुपये गायब झाल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी याबाबत पतीला सांगताच, दोघांनी दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे यांनी दिली. 

टॅग्स :ऑनलाइनगुन्हेगारीपोलिस