Join us  

राष्ट्रवादीने विधान परिषदेच्या आमदारकीची दिलेली ऑफर स्वीकारणार?; राजू शेट्टींनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 3:06 PM

शरद पवार यांचा हाच निरोप देण्यासाठी जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. 

मुंबई: विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना ऑफर देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

राजू शेट्टी यांच्यासारखा लढाऊ नेता विधानपरिषदेत जावा, अशी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच भूमिका असल्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. शरद पवार यांचा हाच निरोप देण्यासाठी जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे राजू शेट्टी राष्ट्रवादीची ही ऑफर स्वीकारणार का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

जयंत पाटील यांच्या भेटीदरम्यान विधानपरिषदेच्या जागेबाबत चर्चा झाली असल्याचे खुद्द राजू शेट्टी यांनी देखील आता स्पष्ट केले आहे. राजू शेट्टी म्हणाले की, जयंत पाटील माझ्या आईची तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी निवासस्थानी आले होते. यावेळी यावेळी या दोघांमध्ये विधानपरिषदेच्या जागांवरुन प्राथमिक चर्चा झाल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. तसेच विधानपरिषदेच्या जागेची मिळालेल्या ऑफरबाबत शरद पवार यांच्यासोबत आगामी काही दिवसात चर्चा करुन निर्णय घेईन असं राजू शेट्टींनी यावेळी सांगितले. 

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त एकूण १२ जागा भरायच्या आहेत. त्यातील किमान चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राजू शेट्टीचे राजकीय विरोधक सदाभाऊ खोत यांना भाजपाने आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची जागा दिली होती. तशीच ऑफर राजू शेट्टींना देण्यात आली आहे. त्यामुळे राजू शेट्टी काय निर्णय घेणार हे येत्या काही दिवसांत समोर येणार आहे.

टॅग्स :शरद पवारराजू शेट्टीराष्ट्रवादी काँग्रेसविधान परिषदविधान परिषद निवडणूकमहाराष्ट्र सरकारजयंत पाटील