हुंड्यासाठी विवाहितेवर विषप्रयोग केल्याचा संशय; पती, सासू-सासरे, नणंद यांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:54 IST2025-10-30T12:53:42+5:302025-10-30T12:54:01+5:30
नेहाचा विवाह नोव्हेंबर २०२४ मध्ये झाला होता आणि अवघ्या ११ महिन्यांत तिचा मृत्यू झाला

हुंड्यासाठी विवाहितेवर विषप्रयोग केल्याचा संशय; पती, सासू-सासरे, नणंद यांना केली अटक
मुंबई : हुंड्यासाठी २४ वर्षीय विवाहितेचा छळ तसेच तिच्यावर विषप्रयोग केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याच्या माहेरच्या मंडळींच्या आरोपावरून खार पोलिसांनी तिचा पती, सासू-सासरे आणि नणंद यांना अटक केली आहे
नेहा गुप्ता (२४) हिचा १६ ऑक्टोबरला मृत्यू झाला होता. याप्रकरणी तिचे वडील राधेश्याम गुप्ता यांनी १८ ऑक्टोबरला तक्रार दिली होती. त्याआधारे नेहाचा पती अरविंद गुप्ता, गुप्ता आणि बहीण प्रीती गुप्ता यांना त्याचे वडील मनोज गुप्ता, आई मीराबाई पोलिसांनी अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालात नेहाच्या मृत्यूचे कारण उघड झालेले नाही. तिच्या मृतदेहाचा व्हिसेरा तपासणीसाठी जतन केला आहे. रासायनिक विश्लेषणाचा अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल, असे खार पोलिसांचे म्हणणे आहे.
नेहाचा विवाह नोव्हेंबर २०२४ मध्ये झाला होता आणि अवघ्या ११ महिन्यांत तिचा मृत्यू झाला. फेब्रुवारीमध्ये तिचा गर्भपात झाला होता. लग्नात सोने, चांदी आणि वाहन दिले होते, तरीही त्यांनी नेहाचा छळ केला, असा आरोप तिचे वडील राधेश्याम यांनी केला. मार्चमध्ये दोन्ही कुटुंबांमध्ये समझोता झाला होता
हळूहळू विष दिले जात असल्याचे नेहाने आम्हाला वारंवार फोनवर सांगितले होते, असे राधेश्याम यांचा आरोप आहे.
नेहाच्या पालकांनी २० मार्चला महिला आयोग आणि खार पोलिसांकडे तक्रार करत त्यात छळाचे आरोप केले होते.
३ ऑक्टोबरला प्रकृती ठीक, १६ तारखेला मृत्यू
पती अरविंद गुप्ता ३ ऑक्टोबरला उत्तर प्रदेशात आला आणि नेहाला घेऊन गेला. दोघे ५ ऑक्टोबरला मुंबईत पोहोचले. त्यानंतर १६ ऑक्टोबरला नेहाचा मृत्यू झाला.
नेहा ३ ऑक्टोबरला पूर्णपणे ठीक होती. त्यामुळे या प्रकरणात काहीतरी संशयास्पद आहे. आम्ही रासायनिक विश्लेषण अहवालाची वाट पाहत आहोत.