सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्याच; शवविच्छेदन अहवालातून उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 04:58 AM2020-06-16T04:58:57+5:302020-06-16T05:00:10+5:30

विलेपार्ले येथील स्मशानभूमीत मित्र, परिवाराच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

Sushant Singh Rajput Postmortem report confirms suicide | सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्याच; शवविच्छेदन अहवालातून उघड

सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्याच; शवविच्छेदन अहवालातून उघड

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या शवविच्छेदन अहवालातून त्याने आत्महत्याच केल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी दुपारी विलेपार्ले येथील स्मशानभूमीत मित्र, परिवाराच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशांतने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयात रविवारी रात्रीच तीन डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शवविच्छेदन केले. सोमवारी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून त्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली. आत्महत्येपूर्वी त्याने कुठलेही व्यसन केले नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. त्याच्या बँक खात्यातील तपशिलानुसार त्याला आर्थिक अडचण नसल्याचेही पोलिसांच्या माहितीत समोर आले आहे.

सुशांत गेल्या पाच महिन्यांपासून तणावात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत त्याने तणावावरील औषध घेणेही बंद केले होते, अशी माहिती त्याच्या नोकर आणि मित्राच्या जबाबातून समोर आली आहे. त्याच्या कॉल रेकॉर्डनुसार, त्याने मित्र महेश शेट्टीला अखेरचा कॉल केला होता; मात्र त्याने तो उचलला नाही. दुपारी १२ वाजता शेट्टीने त्याला कॉल केला. मात्र तोपर्यंत सुशांतचा मृत्यू झाला होता. त्याची जवळची मैत्रीण रियाा चक्रवर्ती हिने माध्यमांची नजर चुकवून कूपर रुग्णालयात दुपारी सुशांतचे अंतिम दर्शन घेतले. तेथे जास्त वेळ न थांबता ती निघून गेली. शेट्टी हा रियाचाही मित्र आहे. पोलीस सर्व बाजूने तपास करीत आहेत.

पोलिसांनी सुशांतचे दोन मॅनेजर, स्वयंपाकी, अभिनेता महेश शेट्टी, सुशांतचा दरवाजा उघडण्यासाठी बोलावलेला चावीवाला असे सहा जणांचे जबाब नोंदवले. यातून, वैयक्तिक नैराश्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तर, व्यावसायिक वादातून त्याने हे पाऊल उचचले का, याबाबतही तपास करू, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी रात्री केलेले टिष्ट्वट पोलिसांना टॅग करत स्पष्ट केले.

कुटुंबीय आणि चाहत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
सुशांतसिंहचे पार्थिव मूळगावी पाटण्यात नेण्यासाठी कुटुंबाने पोलिसांकडे मागितलेली परवानगी नाकरल्यामुळे त्याच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय दुपारी दोनच्या सुमारास मुंबईत दाखल झाले. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सुशांतचे वडील, दोन बहिणी, मित्र, दिग्दर्शक संदीप सिंग, अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता विवेक आॅबेरॉय, गायक उदित नारायण तसेच त्याचे काही चाहते हजर होते.

Web Title: Sushant Singh Rajput Postmortem report confirms suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.