Sushant is our son, CBI has no problem in investigating, says sanjay raut | सुशांत आमचाच मुलगा, सीबीआयकडे तपास देण्यास हरकत नाही, पण... 

सुशांत आमचाच मुलगा, सीबीआयकडे तपास देण्यास हरकत नाही, पण... 

ठळक मुद्देसुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे

नवी दिल्ली - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आता शिवसेना आणि भाजपामध्ये थेट आमने-सामनेची लढाई सुरू झाली आहे. त्यात आज सुशांतच्या कुटुंबीयांनी शांत राहावे आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावे, असा सल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्यानंतर भाजपाकडून राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. आता, संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबीयांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे. तसेच, सुशांत आमचाच मुलगा होता, असेही राऊत यांनी म्हटले.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबीयांना सल्ला दिला होता. तसेच या प्रकरणावरून शिवसेना कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही असं बोलून राऊतांनी खडसावलं आहे. सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्य दिशेने करत आहेत. पुढील तपासासाठी सुशांतच्या कुटुंबियांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांच्या तपासाला सहकार्य करावं. असंही राऊत म्हणाले होते.  

राऊत यांनी सुशांतच्या कुटुबीयांसंदर्भात एक विधान केले होते. सुशांतच्या वडिलांचे दुसरे लग्न झाल्याचे सांगत सुशांत व त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते, असा दावाही राऊत यांनी केला होता. त्यानंतर, संजय राऊत यांच्या विधानावरुन सुशांतच्या कुटुंबीयांनी राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावली. तसेच, माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा असं आवाहनही केलं होतं. त्यानंतर, राऊत यांनी मवाळ भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. 


मी हेच म्हटलं होतं की, सुशांतच्या कुटुंबीयांनी थोडं धीराने घ्यायला हवं. मात्र, मी त्यांना धमकी दिली असाच त्यांचा समज झाला. मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवा, जर तुम्हाला वाटत असेल की, पोलीस आपलं काम योग्य रितीने करत नाही. तर, तपास सीबीआयकडे देण्यास हरकत नाही, असे राऊत यांनी म्हटले. तसेच, सुशांत हा आमचाचा मुलगा होता. तो मुंबईत राहत होता, तो अभिनेता होता. बॉलिवूड हा मुंबईचा परिवार आहे. त्यामुळे, त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, तपासात सर्वच खुलासे झाले पाहिजेत, हीच आमची भूमिका असल्याचेही राऊत यांनी म्हटले.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शाहनवाझ हुसेन म्हणाले की, संजय राऊतजी, साहेब न्याय देता देता तुम्ही बराच उशीर केला. आता तुम्ही सांगता की, सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबीय शांत राहिले तर न्याय मिळेल म्हणून. त्यापेक्षा आता तुम्हीच शांत राहा, सीबीआय न्याय करेल.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant is our son, CBI has no problem in investigating, says sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.