सुरेश धस दोन दिवसांत नवा 'बॉम्ब' टाकणार; हत्या, खंडणी अन् संपत्तीबद्दल कराड-मुंडेंवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:03 IST2025-01-08T12:02:37+5:302025-01-08T12:03:47+5:30
वाल्मीक कराड याने धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानेच जिल्ह्यात चुकीची कामे केल्याचा दावाही सुरेश धस यांच्याकडून करण्यात आला आहे.

सुरेश धस दोन दिवसांत नवा 'बॉम्ब' टाकणार; हत्या, खंडणी अन् संपत्तीबद्दल कराड-मुंडेंवर आरोप
BJP Suresh Dhas: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आक्रमक झालेले भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "बीड जिल्ह्यातील ज्या बँका बुडाल्या आहेत त्यामध्ये वाल्मीक कराडचाही सहभाग आहे. खाडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरी दीड कोटी रुपये सापडले. या खाडेला वाचवायला वाल्मीक कराड होते. म्हणजे वाल्मीक कराड हा चोरांचा आणि दरोडेखोरांचा साथीदार आहे. एका मल्टीस्टेट बँकेला दमबाजी करून या कराडने त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांची डिफेंडर गाडी घेतली, अशी माझी माहिती आहे. अशा पैशांच्या देवाणघेवाणमुळे ज्या बँकांनी लोकांची पैसे बुडवले त्यांची बाजू घेण्याऐवजी धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे पैसे बुडवणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. मी उद्या किंवा परवा जिथे आक्रोश मोर्चा असेल त्या मोर्चात वाल्मीक कराडच्या संपत्तीची आकडेवारी सादर करणार आहे," असा इशारा आमदार धस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.
"परळीतील एका प्रकरणात वाल्मीक कराड याच्यावर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मात्र वाल्मीक अण्णा असं लिहिल्याने अद्याप त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणातील पीडिताची पत्नी एसपींना याबाबत पत्र देणार आहे. तसंच बापू आंधळे खून प्रकरणात काहीही संबंध नसताना बबन गित्ते यांचं नाव गुन्ह्यात टाकण्यात आलं. ते विधानसभेला धनंजय मुंडेंविरोधात उभे राहण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांचा काटा काढण्यासाठी गुन्ह्यात गित्ते यांचं नाव टाकण्यात आलं," असा आरोपही आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
वाल्मीक कराड याने धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानेच जिल्ह्यात चुकीची कामे केल्याचा दावाही सुरेश धस यांच्याकडून करण्यात आला आहे. "धनंजय मुंडे यांचा वाल्मीक कराड जे काही करत होता त्या सर्वाला पूर्ण पाठिंबा होता. त्यांना माहीत नव्हतं का जिल्ह्यात काय सुरू आहे ते?" असा सवाल त्यांनी विचारला.
दरम्यान, नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत विचारलं असता "धनंजय मुंडेंकडे नैतिकताच शिल्लक नाही तर तुम्ही काय नैतिकतेचा मुद्दा काढताय," असा टोला सुरेश धस यांनी लगावला आहे.