'आरोपींना मोक्का लावा, त्यांचा 'तेरे नाम' मधील सलमान झाला पाहिजे'; सुरेश धस यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:30 IST2025-01-07T17:25:51+5:302025-01-07T17:30:40+5:30
Suresh Dhas : भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज सरपंच परिषदेतून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना मोक्का लावण्याची मागणी केली.

'आरोपींना मोक्का लावा, त्यांचा 'तेरे नाम' मधील सलमान झाला पाहिजे'; सुरेश धस यांचा हल्लाबोल
Suresh Dhas ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यभरात मोर्चे काढण्यात येत आहेत. आज मुंबईत सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी भाजपा आमदार सुरेश धस सहभागी झाले होते. यावेळी आमदार धस यांनी देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावण्याची मागणी केली.
"मी होते का तिथे? मग मी कसं एखाद्याचं नाव घेऊ?; कोण दोषी असेल त्याला शिक्षा करा"
सरपंच परिषदेत बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, सरपंच संतोष देशमुख यांचा गुन्हा काय होता? गावातील एका दलित वॉचमनला मारहाण होताना तो रोखायला गेला होता, खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला म्हणून त्याची निर्घुन हत्या केली, असा आरोपही सुरेध धस यांनी केला. संतोष देशमुख पुढं जाऊन जिल्हा परिषद सदस्यही झाला असता. पण त्याची हत्या केल्यामुळे कोणताही सरपंच समाजसेवेचं काम करण्यासाठी पुढे येणार नाही,यामुळे सर्वांनी मिळून देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल याची काळजी घ्यायला पाहिजे, असंही सुरेश धस म्हणाले.
'आरोपींचा 'तेरे नाम' झाला पाहिजे'
"कितीही वेळ होऊद्या देशमुख यांना तुमच्या मनातून जाऊ देऊ नका. ग्रामपंचायतीचे प्रमुख म्हणून तुम्ही आलात. आरोपींना मोक्का लागला पाहिजे, ३०२ मध्ये गेले पाहिजेत. ते बिन भाड्याच्या खोलीत गेले पाहिजेत. त्यांचे नातेवाईत सुद्धा तिथे गेले नाहीत पाहिजे. त्यांचा 'तेरे नाम' झाला पाहिजे, सलमान खान सारखी यांची अवस्था झाली पाहिजे, असंही आमदार धस म्हणाले.
"देशमुख यांच्या पत्नीला नोकरी लागली पाहिजे. नोकरी लावली तर कुणीही तडजोडीला त्यांच्याकडे गेले नाही पाहिजे, हा रोष लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. सरकार सरपंच यांच्याबाबीत पॉझिटीव्ह आहेत. आज सायंकाळी देशमुख यांचं कुटुंब देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, सर्वांनी देशमुख यांच्या कुटुंबीयांसाठी रहा, या प्रकरणात उज्ज्वल निकम यांना केस कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करत आहे, असंही धस म्हणाले.