परीक्षेदरम्यान पर्यवेक्षकाचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन, सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याचे नीलम गोऱ्हे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 20:42 IST2025-03-23T20:40:26+5:302025-03-23T20:42:18+5:30

Neelam Gorhe News- वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Supervisor misbehaves with student during exam, Neelam Gorhe orders strict steps to ensure safety | परीक्षेदरम्यान पर्यवेक्षकाचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन, सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याचे नीलम गोऱ्हे यांचे आदेश

परीक्षेदरम्यान पर्यवेक्षकाचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन, सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याचे नीलम गोऱ्हे यांचे आदेश

मुंबई - वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, तसेच पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या उपाययोजनांमध्ये शिक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे, परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, गुप्त तक्रार नोंदणी यंत्रणा, महिला निरीक्षकांची नेमणूक आणि विद्यार्थ्यांसाठी जागरूकता सत्रे यांचा समावेश आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी लैंगिक छळाबाबत शून्य-सहिष्णुता धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. परीक्षेदरम्यान नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचारी, मदतनीस यांना विद्यार्थ्यांशी शारीरिक संपर्क, इशारे किंवा कोणतेही अन्य अशुद्ध वर्तनासाठी शून्य सहनशीलता धोरण लागू केले जाईल आणि जर कोणतीही व्यक्ती अशा वर्तनात गुंतलेली आढळली तर ती त्वरित शिस्तीच्या कायदेशीर कारवाईला किंवा नोकरीवरून निलंबन कारवाईला सामोरी जाऊ शकते, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना परीक्षा स्थळावर दर्शनी भागामध्ये आणि संबंधितांच्या नियुक्ती पत्रामध्ये नमूद करण्याचे सुचविले आहे.

 परीक्षेदरम्यान नियुक्त पर्यवेक्षक नियंत्रक कर्मचारी यांच्या वर्तनाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे तयार करून विद्यार्थ्यांपासून सुरक्षित अंतर कसे राखावे, शारीरिक संवाद टाळावा फक्त परीक्षा प्रक्रियेवर देखरेख करावी आणि विद्यार्थ्यांसोबत व्यक्तिगत अनावश्यक संवाद साधू नये अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना  त्यांना देण्याबाबत तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचारी ज्यांना परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षक,निरीक्षक म्हणून नियुक्त केले जाईल लैंगिक छळ प्रतिबंध आणि विद्यार्थ्यांसोबत व्यावसायिक वर्तन कसे करावे यावर अनिवार्य प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

त्याबरोबरच सर्व परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून, त्याचे नियमित निरीक्षण परीक्षा दरम्यान अनिवार्य करण्यात यावे. कॅमेऱ्याचा footage परीक्षा संपल्यानंतर एक महिना संग्रहित करणे आवश्यक आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारींमध्ये पुरावा सापडू शकेल. याचबरोबर, या कॅमेऱ्यांच्या अस्तित्वाची माहिती परीक्षेतील सर्व कर्तव्यावर असलेल्या सर्व कर्मचारी /अधिकारी वर्ग यांना करून देण्यात यावी. 

विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांबद्दल आणि तक्रार प्रणालीच्या महत्त्वाबद्दल जागरूक करणारी सत्रे आयोजित केली जावीत. यामध्ये विद्यार्थ्यांना असुरक्षित किंवा अस्वस्थ वाटल्यास कसे आणि कोणत्या व्यवस्थेकडे तक्रार करावी, याबद्दल मार्गदर्शन दिले जावे. तसेच विद्यार्थ्यांना आक्षेपार्ह वर्तन किंवा छळाचा अनुभव आल्यास, त्वरित तक्रार दाखल करण्यासाठी गुप्त आणि सुलभ तक्रार प्रणाली उपलब्ध करावी. ही प्रणाली विद्यार्थ्याची ओळख गुप्त ठेवून तक्रारींचे निराकरण करेल.

 विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची आणि तक्रार प्रणालीच्या महत्त्वाची माहिती देणारी जागरूकता सत्रे आयोजित केली जावीत. या सत्रांमधून विद्यार्थ्यांना परीक्षा दरम्यान किंवा अन्य शैक्षणिक कार्यांमध्ये असुरक्षित किंवा अस्वस्थ वाटल्यास ते आपले अनुभव कसे व कोणत्या व्यवस्थेकडे करु शकतात याबद्दल मार्गदर्शन केले जावे. साध्या वेषातील महिला पोलिसांची परीक्षा केंद्रावर नियुक्ती करण्यात यावी. कोणताही विद्यार्थी अशा वर्तनामुळे अस्वस्थ किंवा त्रासदायक अनुभव घेत असेल, तर त्याला त्वरित मदत, समुपदेशन सेवा देऊन त्याची प्राथम्याने तक्रार दाखल करून घेण्यात यावी.

या उपायोजना म्हणजे एक सुरक्षित आणि आदरणीय शैक्षणिक वातावरण तयार करण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे. शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था प्रशासनाने या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित शालेय/महाविद्यालयीन वातावरण निर्माण करण्यासाठी सहकार्य केल्यास परीक्षा केंद्रांमधील सुरक्षा अधिक बळकट होईल आणि विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळेल, असा विश्वास डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे.
 

Web Title: Supervisor misbehaves with student during exam, Neelam Gorhe orders strict steps to ensure safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.