Suicide of a youth in Mulund by killing his father and grandfather | वडील, आजोबांची हत्या करून मुलुंडमध्ये तरुणाची आत्महत्या

वडील, आजोबांची हत्या करून मुलुंडमध्ये तरुणाची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वडिलांनी अभ्यास करण्यास सांगितल्याने चिडून त्यांची व आजोबांची निर्घृणपणे हत्या करून एका २० वर्षांच्या तरुणाने घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी मुलुंड येथे घडली. मुलाचे मानसिक संतुलन बिघडले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिलिंद सुरेश मांगले (वय ५५), सुरेश केशव मांगले (८५) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. त्यांना तीक्ष्ण चाकूने भोसकल्यानंतर शार्दूल मांगलेने सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यात त्याला जबर मार लागला. मुलुंड पश्चिमेकडील एलबीएस मार्गावरील वसंत ऑस्कर सोसायटीत बिल्स सी इमारतीत फ्लॅट नंबर ६०४ येथे सुरेश मांगले हे मुलगा व वडील यांच्यासमवेत राहत होते. मिलिंद यांची पत्नी काही वर्षांपासून लहान मुलीला घेऊन वेगळी राहत होती. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांनी घरातील कामासाठी एक मदतनीस ठेवला होता.

त्यांनी दार ठोठावले...
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पावणेनऊच्या सुमारास मिलिंद यांनी शेजाऱ्यांचा दरवाजा ठोठावला. त्यांनी आतले दार उघडले आणि रक्ताने माखलेले मांगले त्यांना दिसले. पाठोपाठ शार्दूल चाकू घेऊन आला आणि त्याने मांगले यांच्या पाठीत पुन्हा वार केले. शेजाऱ्यांनी दार लावले, काही काळाने त्यांनी दार पुन्हा उघडले तेव्हा शार्दूल दारातच उभा होता आणि त्यांच्याकडे पाहत होता... मग, शार्दूल घरात गेला. त्यानंतर शेजाऱ्यांनी सोसायटीत इतरांना हा सगळा प्रकार कळवला.

 ...म्हणून त्याला इथे आणले
मिलिंद हे आठ वर्षांपूर्वी विभक्त झाले. त्यांची पत्नी आणि मुली घाटकोपर येथे राहात आहेत. तर, शार्दूल आजी-आजोबांकडे राहत होता. तेथे तो त्रास देऊ लागल्याने त्याला मिलिंद यांनी घरी आणले होते, अशी माहिती समोर येत आहे.

माहिती मिळताच मुलुंड पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिघांना येथील अग्रवाल रुग्णालयात नेले. मात्र त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह वाडिया रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील व अन्य अधिकाऱ्यांनी तेथे पाहणी केली. त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात आले आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गॅलरीतून उडी मारली
nशार्दूल हा बी.कॉमच्या अखेरच्या वर्षात शिकत होता. काही दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याची वडील व आजोबा यांच्याशी भांडणे होत होती. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मिलिंद यांनी त्याला अभ्यास करायला सांगितले. 
nत्यामुळे चिडलेल्या शार्दूलने स्वयंपाकघरातील चाकू घेऊन वडिलांवर वार केले. त्याला अडविण्यासाठी आजोबा सुरेश मांगले गेले असता त्यांच्याही पोटावर व छातीत वार केले. 
nआरडाओरडा ऐकून मदतनीस स्वयंपाकघरातून बाहेर आला. शार्दूलच्या हातात चाकू व दोघे खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून तो बाथरूममध्ये लपला. त्यानंतर शार्दूलने गॅलरीतून उडी मारली. सुमारे 
६० फूट उंचावरून पडल्याने डोक्यावर मोठी दुखापत होऊन तो जागीच निपचित पडला.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Suicide of a youth in Mulund by killing his father and grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.