पश्चिम उपनगरातील दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्या मृतावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 04:10 AM2019-06-23T04:10:58+5:302019-06-23T04:11:18+5:30

मुंबईतील दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या तिन्ही नद्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी रिव्हर मार्च गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे.

In the suburbs of Dahisar, Poissor and Oshiwara rivers in the western suburbs | पश्चिम उपनगरातील दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्या मृतावस्थेत

पश्चिम उपनगरातील दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्या मृतावस्थेत

Next

मुंबई : मुंबईतील दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या तिन्ही नद्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी रिव्हर मार्च गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे. रिव्हर मार्चच्या वतीने २६ मे ते ९ जून दरम्यान तिन्ही नद्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यात तिन्ही नद्या जैविकदृष्ट्या मृतावस्थेत आढळून आल्या. नवनियुक्त महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना १७ जून रोजी तिन्ही नद्यांच्या सद्यस्थितीबाबत एक निवेदन सादर करण्यात आले आहे. तिन्ही नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्याकडून पर्यावरणप्रेमींसह नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या
आहेत.

नालेसफाईनंतर पश्चिम उपनगरातील नद्या, उपनद्यांच्या स्थितीचे प्रत्यक्ष छायाचित्र आणि समस्येवर करण्यात आलेल्या उपाययोजना निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरल्यामुळे नद्यांचा नाला झाला आहे. दहिसर नदीच्या किनाºयावर वसलेल्या गाई-म्हशींच्या तबेल्यातील सर्व प्राण्यांची विष्ठा व मूत्र थेट नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे नदी दूषित झाली आहे. पूर्वी या दोन्ही नद्यांचे पाणी आदिवासी बांधव पिण्यासाठी आणि दैनंदिन वापरासाठी करत होते. सध्या तिन्ही नद्या मृतावस्थेत असून, प्लॅस्टिक, डेब्रिज, कचरा, मलमूत्र विसर्जन प्रामुख्याने नद्यांमध्ये दिसून येते.
पोईसर नदीच्या उगमस्थानानजीक झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. झोपडपट्टीतून निर्माण होणारा कचरा आणि मानवी मलमूत्र पोईसर नदीमध्ये सोडले जाते. कांदिवली पूर्वेकडील क्रांतिनगर येथे रिव्हर मार्चच्या वतीने पोईसर नदीची स्वच्छता आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे तिथे थोड्या प्रमाणात जनजागृती झाली, परंतु काही काळानंतर परिस्थिती ‘जैसे थे’च दिसून आली. नद्या जोपर्यंत उगमस्थानाजवळ आहेत, तोपर्यंत स्वच्छ असतात, परंतु मानवी
वस्तीमध्ये जेव्हा नदी प्रवेश करते, त्यावेळी नद्या दूषित होतात. महापालिकेच्या वतीने नद्यांच्या संरक्षणासाठी भिंत बांधण्यात आली आहे़ संरक्षण भिंतींचाही फारसा उपयोग होताना दिसत नाही, याचेही निरीक्षण रिव्हरमार्चने निवेदनात नोंदविले आहे.
या उपाययोजना अंमलात आणा
सांडपाण्याची स्वतंत्र पाइपलाइन, कचºयाची योग्य विल्हेवाट, दिवसातून जास्त वेळा कचरा उचलणे, नदीपात्र वारंवार स्वच्छ करणे, कचरा टाकणाऱ्यांना दंड, समुद्रात कचरा जाऊ नये, यासाठी तरंगते अडथळे, बंधारे बांधून पाणी साठविणे आणि नदी स्वच्छतेबाबत महापालिका अधिकाºयांना, नगरसेवकांना जबाबदार धरणे गरजेचे आहे, अशा सूचना रिव्हर मार्चने केल्या आहेत.

नवनिर्वाचित महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे पर्यावरणप्रेमी आहेत. मुंबईतल्या नद्यांची सद्यस्थिती काय आहे, याचा एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यावेळी तिन्ही नद्यांची परिस्थिती धक्कादायक असल्याचे निदर्शनास आले. यामुळे तिन्ही दूषित नद्यांचे दर्शन प्रवीण परदेशी यांना घडावे, यासाठी त्यांना तिन्ही नद्यांची छायाचित्रे पाठवून नद्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी योग्य पावले उचलावी, यासाठी रिव्हर मार्चतर्फे निवेदन पाठविण्यात आले आहे.
- सागर विरा, सदस्य, रिव्हर मार्च.

या ठिकाणी तिन्ही नद्यांची बिकट अवस्था

दहिसर नदी ही बोरीवली पश्चिमेकडील हॅप्पी होम सोसायटी, दौलतनगर येथील श्रीकृष्णा कॉम्प्लेक्स आणि दहिसर येथील रुस्तम इराणी मार्ग, नेन्सी कॉलनी येथील नॅशनल पार्क फ्लायओव्हर, दहिसर ब्रीज, रंगनाथ केसकर मार्ग, मंडपेश्वर इत्यादी ठिकाणी नदीची अवस्था दयनीय आहे. पोईसर नदी ही कांदिवली पूर्वेकडील बिहारी टेकडी गावदेवी, जनतानगर, कांदिवली पोलीस लाइन, अली इब्राहिम चाळ (पोईसर), बोरासपाडा रोड, तेरापंती भवनाजवळ, गॅलेक्सी ई विंग, दुर्गानगर इत्यादी ठिकाणी पोईसर नदी दूषित झाली आहे. ओशिवरा नदी गोरेगाव (पूर्व) बेस्टनगर, अंधेरी (पश्चिम), राम अजुग्य तिवारी चाळ क्रमांक एक, रिलिफ रोड (प्रतीक्षानगर), राम मंदिर क्रॉस लेन, प्रबोधन जोगर्स पार्क बी-४१ इत्यादी ठिकाणी ओशिवरा नदी मृत झाली आहे.

Web Title: In the suburbs of Dahisar, Poissor and Oshiwara rivers in the western suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.