कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कृती आराखडा सादर करा; समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 07:57 IST2023-11-17T07:57:05+5:302023-11-17T07:57:18+5:30
मुंबईतील प्रदूषणाची पातळी कमी करायची असल्यास शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे.

कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कृती आराखडा सादर करा; समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : मुंबईतील क्षेपणभूमीवरील (डम्पिंग ग्राऊंड) साठलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी समिती नेमून आठवडाभरात त्याचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मुलुंड, कांजूरमार्ग व देवनार येथील हजारो टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलदगतीने विल्हेवाट लावली जावी. क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे ढीग हटवावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात गुरुवारी केंद्रीय नगर विकास आणि नागरी सुविधा मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या.
मुंबईतील प्रदूषणाची पातळी कमी करायची असल्यास शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने सद्यस्थितीत अस्तित्त्वात असलेल्या कचऱ्याचे जलदगतीने विघटन करण्यासाठी उपलब्ध पर्यायांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षात या घनकचऱ्यापासून खत निर्मिती, वीज निर्मिती करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. कांजूरमार्ग येथील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.