Join us

'अभ्यास करून ZP शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात लवकरच धोरण जाहीर करणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 17:55 IST

अनेक शिक्षक बदल्यांसाठी जिल्हा परिषदा आणि मंत्रालयात वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या बदल्यांच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी अभ्यास गट नेमण्याचा निर्णय घेतला होता

मुंबई - जिल्हा परिषदशिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भातील धोरण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या अभ्यास गटाने त्यांचा अहवाल आज शासनास सादर केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांच्याकडे अभ्यास गटाचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अभ्यास गटाचे सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिले यांनी हा अहवाल मंत्रालयात सुपूर्द केला.

यावेळी मुश्रीफ म्हणाले की, अनेक शिक्षक बदल्यांसाठी जिल्हा परिषदा आणि मंत्रालयात वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या बदल्यांच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी अभ्यास गट नेमण्याचा निर्णय घेतला होता. या अभ्यास गटाने आज आपला अहवाल सादर केला असून त्याचा अभ्यास करुन जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात शासनस्तरावरुन लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने या प्रक्रियेबाबत धोरण निश्चित करण्याचा निर्णय मंत्री श्री.मुश्रीफ यांनी जाहीर केला होता. त्याअनुषंगाने राज्यातील ५ जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अभ्यास गट नेमण्यात आला होता. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील या अभ्यास गटात दिलीप हळदे (रायगड), राहूल कर्डिले (चंद्रपूर), विनय गौडा (नंदुरबार) आणि डॉ. संजय कोलते (उस्मानाबाद) या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता.

अभ्यास गटाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, अभ्यास गटाने राज्यातील सर्व महसुली विभागांमध्ये जाऊन शिक्षकांसह विविध शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधी, शिक्षक आमदार अशा विविध घटकांशी चर्चा केली. यामध्ये विविध ७८ मुद्दे उपस्थित झाले होते. त्या सर्व मुद्यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. सर्वांगाने विचार करुन शिक्षक बदल्यांच्या धोरणाबाबत अहवाल आणि विविध शिफारसी सादर करण्यात आल्या आहेत. अहवाल तयार करण्यासाठी अभ्यास गटाने केलेले प्रयत्न आणि त्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल मंत्री श्री.मुश्रीफ आणि अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी अभ्यास गटाचे कौतुक केले.

टॅग्स :हसन मुश्रीफजिल्हा परिषदशाळाशिक्षक