Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलिया विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विदयार्थ्यांनी संशोधनाचा लोकल टू ग्लोबल उपयोग करावा – विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 16:07 IST

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि युनिर्व्हसिटी ऑफ साऊथ वेल्स यांच्यात सामंजस्य करार

मुंबई - महाराष्ट्रातून साऊथ वेल्स विद्यापीठामध्ये संशोधन करण्यासाठी जाणाऱ्या विदयार्थ्यांनी त्यांच्या संशोधनाचा वापर लोकल टू ग्लोबल करावा, असे मत व्यक्त करतानाच या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात जाऊन संशोधन करण्याची अधिक संधी मिळेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

ऑस्ट्रेलियाच्या साऊथ वेल्स विद्यापीठाचे प्रकुलगरु लॉरी पिअर्सी यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शनिवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य करार केला. या सामंजस्य करारावर साऊथ वेल्स विद्यापीठाचे प्रकुलगरु लॉरी पिअर्सी आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव सिद्धार्थ खरात यांनी स्वाक्षऱ्या केल्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हो करार झाला.

या सामंजस्य करारामुळे ऑस्ट्रेलियाच्या साऊथ वेल्स विदयापीठात महाराष्ट्राच्या 10 पीएचडी करणाऱ्या विदयार्थ्यांना कॅनबेरा कॅम्पसमध्ये तर 10 पीएचडी करणाऱ्या विदयार्थ्यांना सिडनी कॅम्पसमध्ये राहून शिकण्याची संधी मिळणार आहे. श्री. तावडे यांनी सामंजस्य करारानंतर बोलताना सांगितले की, महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांची संख्या जवळपास दरवर्षी  जवळपास 70 लाख आहे. मात्र पदव्युत्तर शिक्षण घेऊन संशोधन करणाऱ्यांची संख्या कमी आहे. आता या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील विदयार्थी ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठामध्ये जाऊन संशोधन करणार आहेत. या विदयार्थ्यांचे संशोधन देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरताना महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याचा उपयोग होणे आवश्यक आहे. दरवर्षी महाराष्ट्रातून वेगवेगळया विद्यापीठातून वेगवेगळया क्षेत्रातून ५०० विदयार्थ्यांना संशोधन पूर्ण केल्यावर डॉक्टरेट मिळते, अशा वेळी या विदयार्थ्यांनी केलेले संशोधन महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाचे ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या साऊथ वेल्स विदयापीठाचे प्रकुलगरु लॉरी पिअर्सी यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना सांगितले की, महाराष्ट्राला शैक्षणिक, आर्थिक, वाणिज्यिक, सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे साऊथ वेल्स विद्यापीठाला महाराष्ट्र राज्याबरोबर सामंजस्य करार करताना आनंद होत असून या करारामुळे संशोधन क्षेत्रात वेगळे काही करु इच्छिणाऱ्यांना येथील विदयापीठात संशोधन करण्याची चांगली संधी मिळणार असून याचा फायदा ऑस्ट्रेलियाबरोबरच महाराष्ट्राला आणि पर्यायाने भारताला होणार आहे.

ऑस्ट्रोलियाचे वाणिज्य आयुक्त पीटर कोलेमन, ऑस्ट्रेलियाच्या साऊथ वेल्स विद्यापीठाचे प्रकुलगरु लॉरी पिअर्सी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव सिद्धार्थ खरात, अमित दासगुप्ता, मोहा व्यास, स्गिन्धा मोईत्रा, ग्रेन ॲन लोबो, महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.शशिकला वंजारी, शिक्षण संचालक डॉ.धीरज माने, रोहित मनचंदा आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ ॲपचे विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ च्या ॲपचे शनिवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ हे ॲप महेश निलजे यांनी तयार केले आहे. हे ॲप तयार करण्यासाठी निलजे यांना जवळपास ७ महिन्यांचा कालावधी लागला असून या ॲपमध्ये एकूण १६ प्रकरणांचा समावेश असून एकूण १७ शेडयूल यामध्ये आहेत. हे ॲप निलजे यांनी विकसित केले असून हे मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेत उपलब्ध आहेत. अँड्राईड मोबाइल फोनमध्ये गुगल स्टोरमधून एमपीयुए (MPUA) या नावाने हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे. एकदा हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर ऑफलाईनमध्येही मोबाइल धारकांना याचा उपयोग करता येईल.  महेश निलजे हे  विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठ वडगाव, जि. कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.

आज या ॲपच्या उद्घाटनाच्या वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव सिद्धार्थ खरात, महाराष्ट्र राज्य महाविदयालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे महासचिव रावसाहेब त्रिभुवन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संबंधित उपस्थित होते.

 

 

टॅग्स :शैक्षणिकविनोद तावडेसरकारमहाराष्ट्र सरकार