सेना बलशाली करा, विजयोत्सव मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 07:47 IST2025-01-24T07:47:34+5:302025-01-24T07:47:59+5:30
Mumabi News: बाळासाहेबांच्या विचारांचे जे मारक आहेत, ते काय बाळासाहेबांचे स्मारक बांधणार? ज्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार बाजूला सारला त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकात जाताना आधी बाळासाहेबांची आणि जनतेची माफी मागितली पाहिजे, असा घणाघात शिंदेसेनेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

सेना बलशाली करा, विजयोत्सव मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई - बाळासाहेबांच्या विचारांचे जे मारक आहेत, ते काय बाळासाहेबांचे स्मारक बांधणार? ज्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार बाजूला सारला त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकात जाताना आधी बाळासाहेबांची आणि जनतेची माफी मागितली पाहिजे, असा घणाघात शिंदेसेनेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजयोत्सव मेळाव्यात ते बोलत होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आपण आमदार, खासदार किंवा मंत्री व्हाल, त्यापेक्षा बाळासाहेबांचे शिवसैनिक होणे अधिक महत्त्वाचे आहे. बाळासाहेबांचा विचार जपण्याचे काम आपण करत आहोत. जनतेशी आणि शिवसैनिकांशी आपली नाळ जोडली गेलेली आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचे आणि विकासाचे काम आपल्याला यापुढे दुप्पट वेगाने करायचे आहे. सत्तेच्या दोन- अडीच वर्षांत आपण केलेले काम हे अन्य सरकारांच्या तुलनेत खूपच अधिक आहे, हे जनताच सांगते आहे. त्यामुळे त्या कामाची पोचपावती जनतेने आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून दिलीच, विधानसभेत ८० जागा लढवून आपण ६० जागा जिंकल्या, तर उबाठासेनेपेक्षा आपण विधानसभेत १५ लाख मते जास्त घेतली आणि लोकसभेत २ लाख मते जास्त घेतली. ही जनतेने आपल्याला दिलेली पोचपावती आहे.
खरी शिवसेना कुणाची यावर जनतेचे शिक्कामोर्तब
हा विजयोत्सवाचा मेळावा आनंद देणारा आहे. पुढील पिढ्या निश्चितच हा देदीप्यमान विजय लक्षात ठेवतील. खरी शिवसेना कुणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले असल्याचे शिंदे म्हणाले.
हा विजय २ कोटी ४० लाख लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आणि लाडक्या ज्येष्ठांनी दिला असल्याचे शिंदे
यावेळी म्हणाले. मेळाव्यात शिंदेसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला, तर एकनाथ शिंदे यांचाही भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
...तर बाळासाहेबांनी पाठ थोपटली असती
बाळासाहेब असते तर आज आपल्याला शाबासकी दिली असती. आपली पाठ थोपटली असती. आज लाडक्या बहिणींनी माझा सत्कार केला. हा घरच्यांनी केलेला कौतुक सोहळा आहे. कितीही आपण झेंडे गाडून आलो तर घरी आल्यावर आई आपल्यावरून भाकरी तुकडा ओवाळून टाकते तेव्हा जसा आनंद वाटतो, तसा आनंद झाला आहे.
शिवसेना वाढवा
पुढील वर्ष हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षात गावागावांत शिवसेना आणि घराघरांत शिवसैनिक तयार करा. शिवसेना अधिक बलशाली करा, हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल, असेही ते यावेळी म्हणाले.