प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 06:24 IST2025-12-24T06:24:45+5:302025-12-24T06:24:55+5:30
शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने ६ डिसेंबरला बीकेसीतील मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटची पाहणी केली होती.

प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस
- अमर शैला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेच्या वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन कंत्राटदाराने न केल्याचा फटका मंडाळे ते डी. एन. नगर मेट्रो-२ बीच्या कामाला बसणार आहे. पालिकेच्या एच पूर्व विभागाने ‘एमएमआरडीए’चा कंत्राटदार ‘जे. कुमार’ला बीकेसीतील आरएमसी प्लांटचे काम थांबविण्याची नोटीस बजावली असून प्रकल्प साईट सील करण्याचा इशाराही दिला आहे.
शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने ६ डिसेंबरला बीकेसीतील मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटची पाहणी केली होती. त्याचा अहवाल समितीने १५ डिसेंबरला दिला होता. त्याचवेळी एमएमआरडीएचा कंत्राटदार जे. कुमारला ११ डिसेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पालिकेने पुन्हा १२ डिसेंबरला आरएमसी प्लांटची तपासणी केली होती. त्यात या मेट्रो मार्गिकेचा आरएमसी प्लांट, कास्टिंग यार्ड आणि मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान सर्रास प्रदूषण प्रतिबंधक नियमांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नसल्याचे आढळले होते. याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.
आरएमसी प्लांटमध्ये बांधकाम साहित्य गाडीतून उतरविताना आणि भरताना, धूळ उडू नये म्हणून पाण्याची फवारणी न करणे, बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने झाकलेली नसणे, टायर धुण्याची सुविधा बांधकामस्थळी नसणे, बांधकाम साईट टारपोलिनने पूर्णपणे झाकलेली नसणे, बांधकामस्थळाकडे जाणारा रस्ता धूळ आणि डेब्रिसफ्री न ठेवणे, बांधकामातील माती, डेब्रिस नियोजित ठिकाणी बॅरिकेटिंग करून न ठेवणे आदी त्रुटी पाहणीत आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर पालिकेने कारवाईचा पवित्रा घेतला आहे.
एमएमआरडीएचा प्रतिसाद नाही
याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच कंत्राटदारावर काय कारवाई केली याची माहितीही दिली नाही.
प्रकल्पाला आणखी विलंब
कंत्राटदाराने नियमांचे पालन केल्यामुळे मेट्रो-२ बी प्रकल्पाचे काम थांबणार आहे. त्यामुळे आधीच विलंब झालेल्या या प्रकल्पाचे काम आणखी लांबणार आहे. परिणामी, पुढील वर्षी सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याचे काम रखडणार आहे.
काम थांबविले की नाही?
पालिकेने कंत्राटदाराला १९ डिसेंबरला काम थांबविण्याची नोटीस बजावली आहे. आता प्रत्यक्ष बांधकामस्थळी काम थांबविण्यात आले आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.