Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी महाराष्ट्रातील जात्यंध, धार्मिक विचार थांबवा : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 06:13 IST

‘केंद्रातील भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी’, पटोले यांचा आरोप

मुंबई : पुरोगामी विचारानेच महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले आणि हाच विचार राज्याच्या हिताचा आहे. अलीकडच्या काळात मात्र जात्यंध, धार्मिक विचारांनी राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. हा जात्यंध विचार थांबवण्याची गरज असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी व्यक्त केले. काँग्रेस कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नाना पटोले म्हणाले की, राज्यात पुरोगामी विचार रुजलेला आहे, त्याला छेद देण्याचे काम काही लोक करत आहेत. 

हा विचार राज्याच्या प्रगतीसाठी घातक आहे. केंद्रातील भाजप सरकारने कामगार हिताच्या कायद्यात मोठे बदल करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. मूठभर भांडवलदारांच्या दावणीला बांधून कामगारांचे हक्क व अधिकार हिरावण्याचे काम केले आहे. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल फेल झाल्याचे सांगितले. 

महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर मोदी सरकारकडे सांगण्यासारखे काहीही नाही. मोदी सरकारचे हे अपयश लपवण्यासाठी भाजपला बूस्टर सभा घ्याव्या लागत आहेत. पण जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :नाना पटोलेकाँग्रेसभाजपा