सावत्र वडिलांची मुलाला पट्ट्याने मारहाण, आजीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:20 IST2025-01-02T14:20:22+5:302025-01-02T14:20:54+5:30
तक्रारदार या बोरीवली पश्चिम परिसरात राहत असून त्यांच्या ३५ वर्षीय मुलीचे लग्न सप्टेंबर २०१५ मध्ये झाले होते. मात्र २०१९ मध्ये तिच्या पतीचे निधन झाल्याने ती पुन्हा मुलासोबत आईकडे राहू लागली.

सावत्र वडिलांची मुलाला पट्ट्याने मारहाण, आजीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
मुंबई : सावत्र वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाला पट्ट्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलाच्या ६४ वर्षीय आजीने अंबोली पोलिसात अंकित चौधरी (३८) याच्याविरोधात मंगळवारी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी बीएनएस कायद्याचे कलम ३५२, ११८(१), ११५(२) आणि अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याचे कलम ७५ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
तक्रारदार या बोरीवली पश्चिम परिसरात राहत असून त्यांच्या ३५ वर्षीय मुलीचे लग्न सप्टेंबर २०१५ मध्ये झाले होते. मात्र २०१९ मध्ये तिच्या पतीचे निधन झाल्याने ती पुन्हा मुलासोबत आईकडे राहू लागली.
अंधेरी येथील एका मोबाइलच्या कंपनीत काम करताना सहकारी अंकित याच्याशी तिची ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाल्याने ती अंकितच्या घरी मुलासह राहायला गेली. त्यानंतर मुलगी कुटुंबीयांच्याही संपर्कात नव्हती. तक्रारीनुसार, ३० डिसेंबर रोजी मुलाचा मामा कामावरून घरी येताना त्याने भाच्याला घराच्या गेटजवळ रडताना पाहिले. त्याने मुलाला विचारल्यावर ‘अंकितने त्याला इथे आणून सोडले आहे आणि शिवीगाळ करत कंबरेच्या बेल्टने मारले आहे’, असे सांगितले.
पाय, डोळ्याजवळ इजा
मुलाच्या डाव्या पायाला, डाव्या डोळ्याजवळ, पाठीवर दुखापत झाली होती. मुलगा शाळेत जाण्याचा हट्ट करत असल्याने हा प्रकार घडल्याचा अंकितचा आरोप आहे, तसेच त्याला त्याच्या आजीकडे नेऊन सोडायला सांगत होता. मात्र, या रागात अंकितने मुलाला मारहाण केली, असेही तक्रारदाराचे म्हणणे आहे.