मोबाइलच्या व्यसनापासून दूर राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 04:19 AM2019-08-14T04:19:05+5:302019-08-14T04:19:32+5:30

अरे, काय सारखा मोबाइल हातात घेऊन बसलास, जरा अभ्यास कर किंवा खेळायला जा! आजकाल सगळेच त्या मोबाइलमध्ये डोके आणि डोळे खूपसून बसतात.

Stay away from mobile addiction | मोबाइलच्या व्यसनापासून दूर राहा

मोबाइलच्या व्यसनापासून दूर राहा

Next

- डॉ. समिधा गांधी
अरे, काय सारखा मोबाइल हातात घेऊन बसलास, जरा अभ्यास कर किंवा खेळायला जा!
आजकाल सगळेच त्या मोबाइलमध्ये डोके आणि डोळे खूपसून बसतात. कोणाशी बोलायला नको आणि कोणाचे काही ऐकायला नको!
ही वाक्ये परिचयाची वाटतात ना! कमीअधिक फरकाने सगळ्यांच्याच घरात अशी वाक्ये ऐकायला मिळतात.
मोबाइलच्या अतिवापरामुळे काय होते हे आपण मोबाइलवरच गुगलसर्च करून वाचलेले असेल. जसे दारू, सिगारेट किंवा इतर मादक पदार्थांचे व्यसन सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रे असतात तशीच आता अतिमोबाइल वापराच्या व्यसनापासून मुक्तता मिळवण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे, हेसुद्धा तुम्हाला माहिती असेलच.
आपण मोबाइलचा वापर करायचाच नाही असे सर्वसामान्यपणे करू शकत नाही. अतिवापराचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहेत. मग करायचे काय? मध्यम मार्ग निवडायचा.
सुरुवातीला घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या घरासाठीचे मोबाइल वापराबद्दलचे नियम ठरवायचे. जसे किती वेळ मोबाइलचा अवांतर वापर करायचा. म्हणजेच अभ्यासाचा वेळ सोडून किती वेळ मोबाइलवर खेळायचे, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियाचा वापर किती करायचा, लहान मुलांना वयाच्या कोणत्या वर्षापासून मोबाइल द्यायचा, गप्पा मारण्यासाठी बसलेले असताना मोबाइल बंद ठेवायचा, जेवताना मोबाइलचा वापर टाळायचा की नाही, असे नियम ठरवून घ्यायचे. हे नियम घरातल्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनी प्रामाणिकपणे पाळायचे.
सर्वसाधारणपणे घरातली मोठी माणसे जर नियम तोडत नसतील तर लहान मुलेदेखील नियम पाळताना दिसतील. नियम मोडणाऱ्याने त्याबद्दल स्पष्टीकरण देणे अपेक्षित असावे. वारंवार नियम मोडणाºया व्यक्तीस काय शिक्षा द्यावी हेदेखील ठरवता येईल. यासाठी कोणाचाही अपवाद करू नये.
जसे घरात तसेच समाजात वावरताना काही संकेत, काही नियम पाळावेत. सार्वजनिक ठिकाणी, सिनेमागृहात मोबाइल बंद ठेवावा. जर काही कारणाने ते शक्य नसेल तर मोबाइल सायलेंट मोडवर ठेवावा. ट्रेन, बसमध्ये मोबाइलवर मोठमोठ्या आवाजात बोलू नये. डॉक्टरकडे किंवा कोणत्याही महत्त्वाच्या मिटिंगमध्ये मोबाइल बंद ठेवावा.
रस्त्यावर चालताना, वाहन चालवताना मोबाइलचा वापर पूर्णपणे टाळावा. यामुळे अनेक अपघात होण्याची शक्यता कमी होईल.
यादी मोठी आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण त्या यादीत भर घालू शकेल. शेवटी एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते की, काही वर्षांपूर्वी मोबाइल नव्हते तरीही जगात सगळ्यांची सगळी कामे व्यवस्थित चालू होती. त्यामुळे कोणतेही नवीन तंत्रज्ञान आपल्यासाठी वापरायचे की आपण त्या तंत्रज्ञानाचे गुलाम व्हायचे हे आपल्यावरच अवलंबून आहे.
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)
samidhaygandhi@gmail.com

Web Title: Stay away from mobile addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.