Stay awake ... Only the Deputy Chief Minister will sworn NCP, prafull patel says in mumbai | जागते रहो...  उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार, 2-3 तासात नाव समजणार 

जागते रहो...  उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार, 2-3 तासात नाव समजणार 

मुंबई - महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची यशवंत चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अहमद पटेल, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे यांच्यासह अजित पवार आणि काही महत्त्वाचे नेते हजर होते. या बैठकीनंतर बाहेर पडल्यावर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी चुप्पी साधली. पण, प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्रीपदाचं गुढ उलघडलं. 

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतील, त्यांच्यासमवेत प्रत्येक पक्षाचे 1 किंवा 2 मंत्री शपथ घेतील. राष्ट्रवादीचे दोन मंत्री शपथ घेणार आहेत. आज मध्यरात्री या मंत्र्यांची नावे ठरणार आहेत. या शपथविधी सोहळ्यानंतर, महाविकास आघाडीकडून विश्वासदर्शक ठराव संमत होईल. इतर मंत्र्यांच्या नावाची घोषणा 3 डिसेंबरनंतर होईल, असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचा आमदार असेल, तर उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असणार असून केवळ एकच उपमुख्यमंत्री असणार आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय. पण, उपमुख्यमंत्रीपदी कोण असणार हे त्यांनी सांगितलं नाही.  

महाविकास आघाडीच्या बैठकीत शपथविधी आणि खातेवाटपाबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यातच, विधानसभा अध्यक्षपदावरुन खलबतं झाली आहेत. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी चिंता करण्याची कारण नाही, असे म्हटलंय. तर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हेरी गुड एवढंच म्हटलंय. बाळासाहेब थोरात यांनीही सकारात्मक चर्चा झाली असून उर्वरित चर्चा रात्री होणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे, जागावाटपाचा आणि सत्तावाटपाच तिढा कायम असल्याचं दिसून येतंय. मात्र, उद्या उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही आमदार शपथ घेणार असल्याचं समजतंय.  महाविकास आघाडीच्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक चालली, पण अद्यापही इतर मंत्र्यांची नावं किंवा माहिती जाहीर करण्यात आली नाही.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Stay awake ... Only the Deputy Chief Minister will sworn NCP, prafull patel says in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.