राज्याचे हवाई क्षेत्र घेणार टेक ऑफ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 07:45 AM2021-04-01T07:45:55+5:302021-04-01T07:46:28+5:30

राज्यातील हवाई क्षेत्र लवकरच चांगले टेक ऑफ घेण्याची चिन्हे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

The state's airspace will take off | राज्याचे हवाई क्षेत्र घेणार टेक ऑफ

राज्याचे हवाई क्षेत्र घेणार टेक ऑफ

Next

मुंबई : राज्यातील हवाई क्षेत्र लवकरच चांगले टेक ऑफ घेण्याची चिन्हे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. येत्या दोन महिन्यात शिर्डीच्या विमानतळावर नाईट लँडिंगची सोय होणार आहे. अमरावती येथील विमानतळावर पॅसेंजर टर्मिनस व हवाई वाहतूक टॉवर उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे ५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सोय होण्यासाठी ६४ एकर भूसंपादन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एमएडीसीच्या संचालक मंडळाची ७४ वी बैठक वर्षा निवासस्थानी झाली. त्यावेळी विमानतळांचा झपाट्याने विकास करण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
शिर्डीतील साई मंदिरात होणाऱ्या काकड आरतीला भक्तांना उपस्थित राहता यावे यासाठी नाईट लँडिंगची सोय महत्त्वाची आहे. या विमानतळावरून कार्गो विमानसेवा २५ मार्चला सुरू झाली आहे. इंडियन मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंटला नाईट लँडिंगची साधने बसविण्याची परवानगी मागण्यात आली असून ती मिळताच दोन महिन्यात त्या ठिकाणी नाईट लँडिंगची सोय होईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. अमरावती येथून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याची तयारी अलायन्स एअर कंपनीने दाखविली आहे. गेल्या तीन महिन्यात विमानतळांच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दीपक कपूर यांनी दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. 
चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय आणि रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे विमानतळ लवकर कार्यान्वित व्हायला हवे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामाबाबत डीजीसीएने अहवाल दिला आहे. त्या निकषानुसार वेळेत धावपट्टीचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. निश्चित अशा कालमर्यादेत काम पूर्ण व्हावे यासाठी विमानतळ विकास कंपनी, एमआयडीसी यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Web Title: The state's airspace will take off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.