Join us  

कोरोनावरून लक्ष विचलित करण्यासाठी गृहमंत्री करताहेत अशी विधाने, प्रवीण दरेकरांचा टोला

By बाळकृष्ण परब | Published: September 20, 2020 12:16 PM

काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा धक्कादायक दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमत ऑनलाइनच्या ''ग्राउंड झीरो''कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत केला होता.

ठळक मुद्देराज्याच्या गृहमंत्र्यांनी असं बोलणं अपेक्षित नाहीराज्यात अशी कृत्ये करण्याची अधिकाऱ्यांची हिंमत नाहीपोलीस अधिकाऱ्यांना आपल्या मर्यादा माहिती आहेत

मुंबई - राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार काही आयपीएस अधिकाऱ्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा सनसनाटी गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला होता, दरम्यान, अनिल देशमुख यांच्या या विधानावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी गृहमंत्री अशी विधाने, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्याच्या गृहमंत्र्यांनी असं बोलणं अपेक्षित नाही. राज्यात अशी कृत्ये करण्याची अधिकाऱ्यांची हिंमत नाही. पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या मर्यादा माहिती आहेत. गृहमंत्री राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी अशी विधाने करत आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता खळबळजनक दावाकाही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा धक्कादायक दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमत ऑनलाइनच्या ''ग्राउंड झीरो''कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत केला होता. सरकार पाडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. ते नेमके काय प्रकरण आहे? कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत? कोणत्या अधिकाऱ्यांची नावे तुमच्या समोर आली आहेत आणि तुम्ही हे कसे थांबवले, असा थेट सवाल केला असता गृहमंत्री म्हणाले, ठीक आहे, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. पण हे सांगताना गृहमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि नाराजी लपून राहिली नव्हती.मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले.

टॅग्स :प्रवीण दरेकरअनिल देशमुखमहाराष्ट्र सरकारपोलिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस