Join us  

राज्याने मेहनती व अभ्यासू उद्योजक गमावला, दिग्गजांकडून काकासाहेबांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 9:46 PM

काकासाहेब चितळेंना शुक्रवारी रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना मिरज येथील खासगी

पुणे - भिलवडी (ता.पलूस) येथील मे.बी.जी.चितळे डेअरीचे संचालक, प्रसिद्ध उद्योगपती दत्तात्रय भास्कर चितळे तथा काकासाहेब चितळे (वय ७८) यांचे मिरज येथे शनिवार, दि. ८ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. काकासाहेबांच्या निधनानंतर राज्याभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चितळेंना श्रद्धांजली वाहिली आहे. 

काकासाहेब चितळेंना शुक्रवारी रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. काकांच्या निधनानंतर राज्यातील दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, काकासाहेब चितळे यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. दुग्धोत्पादन क्षेत्रात त्यांनी स्वतःचं निर्माण केलेलं स्थान अढळ आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे अजित पवार यांनी म्हटलंय. तर, राज्याने मेहनती व अभ्यासू उद्योजक गमावल्याची भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक दिग्गज नेत्यांनी चितळेंच्या कार्याचा उल्लेख करत त्यांना श्रद्दांजली वाहिली. देवेंद्र फडणवीस यांनी काकासाहेबांचा उल्लेख करताना, उद्योगासह सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते, असे म्हटले. तसेच, एका लहानशा रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर करण्याचे काम त्यांनी केल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळेंनीही आदर्श उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली.   

टॅग्स :उद्धव ठाकरेसांगलीपुणेअजित पवार