आखाती देशात अडकलेल्यांसाठी राज्य सरकार केंद्राच्या संपर्कात; मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विशेष जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 06:20 IST2026-03-04T06:19:51+5:302026-03-04T06:20:06+5:30
दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील १६४ पर्यटकांना दोन विशेष विमानांद्वारे मुंबईत आणणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आखाती देशात अडकलेल्यांसाठी राज्य सरकार केंद्राच्या संपर्कात; मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विशेष जबाबदारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विविध प्रशासकीय यंत्रणांशी सातत्याने संपर्कात असून, केंद्र सरकारशीही नियमित समन्वय साधत आहेत. नागरिकांना तातडीची मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. समन्वय प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी फडणवीस यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. सरकारने घेतलेल्या या पुढाकारामुळे संबंधित नागरिकांच्या स्वकीयांना दिलासा मिळाला आहे.
१६४ पर्यटकांना खास विमानाने आणणार : शिंदे
दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील १६४ पर्यटकांना दोन विशेष विमानांद्वारे मुंबईत आणणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. युवासेना व महाराष्ट्र मंडळाच्या समन्वय - धूलिवंदनानिमित्त ते आनंद आश्रमात आले होते. शिंदे म्हणाले, दुबईत अडकलेल्या प्रवाशांनी मदतीसाठी संपर्क साधला होता. यामध्ये पुणे, ठाणे, मुरबाड, शहापूर व मुंबईतील पर्यटकांचा समावेश हाेता. दुबईतील महाराष्ट्र मंडळ, डॉ. संजीव पैठणकर आणि युवासेनेचे राहुल कनाल यांच्या समन्वयातून या नागरिकांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था केली हाेती.
भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध : सुनेत्रा पवार
आखाती प्रदेशातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता आणि त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. संबंधित यंत्रणांमार्फत सर्व नागरिकांशी सातत्याने संपर्क साधला जात असून, त्यांना आवश्यक ती मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुबईतील इंडियन पीपल्स फोरम यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सरकारने मदतीसाठी ९७१५०३६५४३५७ हा व्हॉटसॲप क्रमांक जाहीर केला आहे. अडचणीत असलेल्या नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.