The state government give Big responsibility to Arvind Sawant with a cabinet rank | मंत्रिपदाच्या दर्जासह राज्य सरकारने अरविंद सावंत यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी 
मंत्रिपदाच्या दर्जासह राज्य सरकारने अरविंद सावंत यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी 

मुंबई - भाजपासोबतची युती तुटल्यानंतर केंद्रातील मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा देणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समिती या त्रिसदस्यीस समितीची स्थापना केली असून, या समितीचे अध्यक्षपद अरविंद सावंत यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या पदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. 

केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या विविध प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील संसद सदस्यांची  27 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. दरम्यान, या बैठकीत राज्यासंबंधीच्या विविध प्रस्तावांचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता राज्य सरकारने 'महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समिती' या नावाने त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.  

गेल्यावर्षी विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकीय समीकरणे बदलली.भाजप-शिवसेनेची युती तुटली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले त्यापूर्वी शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडली होती. मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता.आज उद्धव ठाकरे यांनी त्यांना संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणून नेमताना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देत एकप्रकारे पुनर्वसन केले.

Web Title: The state government give Big responsibility to Arvind Sawant with a cabinet rank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.