राज्य सरकार विरुद्ध भाजपा वाद रंगणार; वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्याला परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 07:50 PM2020-12-25T19:50:17+5:302020-12-25T20:12:43+5:30

Politics News:  केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या अख्यारीतीत असलेल्या या क्रीडा संकुलाचे श्री अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र असे नामकरण तसेच येथे त्यांचा 15 फूटी पुतळ्याच्या भूमीपूजन सोहळ्याला राज्य सरकारने परवानगी नाकारल्याने खास या सोहळ्याला आलेले केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी प्रोटोकॉल पाळत ते या कार्यक्रमाला आले नाही अशी माहिती उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.

State government denies permission for Vajpayee's naming and Bhumi Pujan in Kandivali | राज्य सरकार विरुद्ध भाजपा वाद रंगणार; वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्याला परवानगी नाकारली

राज्य सरकार विरुद्ध भाजपा वाद रंगणार; वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्याला परवानगी नाकारली

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आज देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची 96 वी जयंती आहे. कांदिवली (पूर्व ) आकुर्ली रोड,समता नगर पोलिस स्टेशन जवळील  भारत सरकारच्या क्रीडा संकुलाचे श्री अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र असे नामकरण व वाजपेयी यांच्या 15 फूटी पुतळ्याच्या आजच्या भूमीपूजन कार्यक्रमाला राज्य सरकारने परवानगी नाकरल्याने भाजपा तर कमालीची संतप्त झाली आहे. त्यामुळे आगामी काळात यावरून राज्य सरकार विरुद्ध भाजपा यामध्ये वाद चिघळणार आहे.

 क्रीडा व युवक सेवा आयुक्त, महाराष्ट्र राज्य,पुणे ओम प्रकाश बकोरिया यांनी त्यांच्या दि,22 डिसेंबरच्या पत्रांन्वये येथील महाराष्ट्र शासनाच्या जागेवर परस्पर नामकरण पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र शासनाच्या विना मान्यता करणे नियमास धरून नाही. याबाबत अनियमता झाल्यास भारतीय क्रीडा प्राधिकरण जबाबदार राहील,अन्यथा कायदेशीर करवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे त्यांच्या आदेशात नमूद केले आहे. कार्यक्रमाच्या तीन दिवस अगोदर क्रीडा व युवक सेवा आयुक्तांनी परवानगी नाकारल्याने आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भाजपा नेते संतप्त झाले. यावेळी महिला व युवकांची मोठी उपस्थिती होती.

 केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या अख्यारीतीत असलेल्या या क्रीडा संकुलाचे श्री अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र असे नामकरण तसेच येथे त्यांचा 15 फूटी पुतळ्याच्या भूमीपूजन सोहळ्याला राज्य सरकारने परवानगी नाकारल्याने खास या सोहळ्याला आलेले केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी प्रोटोकॉल पाळत ते या कार्यक्रमाला आले नाही अशी माहिती उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.

उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी याप्रकरणी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाशी 2018 पासून सातत्याने  पाठपुरावा केला होता. समाजातील महापुरुषांच्या विचारांचा आदर्श स्थापित करण्याच्या दिशेने मला हे मोठे यश मिळाले असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे मुख्य प्रतोद व आमदार अँड.आशिष शेलार,खासदार मनोज कोटक, मुंबईचे प्रभारी व स्थानिक आमदार अतुल भातखळकर,भाजपा विधीमंडळ उपनेते व आमदार भाई गिरकर,आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे,उत्तर मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष 
गणेश खणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अँड.आशिष शेलार म्हणाले की,या सोहळ्यात मीठ टाकण्याचे काम महाराष्ट्र सरकारने केले त्यांचा आम्ही निषेध करतो. खासदार शेट्टी यांनी 2018 पासून यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि सर्व प्राधिकरणाशी परवानग्या मिळवण्यासाठी पत्रव्यवहार केला. आणि चार दिवसात असे काय घडले की सदर सोहळ्याला परवानगी नाकारण्यात आली असा सवाल त्यांनी केला.

जर येत्या तीन महिन्यात येथे अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा बसवण्यास सरकारने परवानगी दिली नाही तर भाजपा तीव्र आंदोलन छेडेल.तर आम्ही संसदेत क्रीडा  व युवक सेवा आयुक्तांच्या विरोधात आवाज उठवून त्यांच्यावर हक्कभंग आणू. तसेच वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागू असा इशारा खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिला. 

येथील क्रीडा प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या क्रीडा संकुलाच्या नामांतराला व श्रद्धेय अटल बिहारी यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन समारंभाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पक्ष तीव्र निषेध करीत असून आमच्यावर गुन्हे दाखल केले किंवा आम्हाला तुरुंगात टाकलात तरीही अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारणाच, हिम्मत असेल तर अडवून दाखवा, असे खुले आव्हानच भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

अशा अजातशत्रू स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा व त्यांच्या पुतळा उभारण्याच्या कार्यक्रमाला असहिष्णु महाविकास आघाडी सरकारने विरोध करून अत्यंत घाणेरडे राजकारण चालविले आहे. केवळ विरोध करून हे सरकार थांबले नसून या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशा सूचना सुद्धा केंद्रीय क्रीडा मंत्री  किरण रिजिजू यांना देण्यात आल्या अशी माहिती आमदार भातखळकर यांनी दिली.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला महाविकास आघाडी सरकारने पुढील तीन महिन्यात रितसर परवानगी न दिल्यास, भारतीय जनता पक्षाचे हजारो कार्यकर्ते 'कारसेवेच्या' माध्यमातून त्यांचा पुतळा या ठिकाणी उभारतील,असा इशारा सुद्धा आमदार भातखळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Web Title: State government denies permission for Vajpayee's naming and Bhumi Pujan in Kandivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.