एसटी लवकरच करणार पेट्रोल-डिझेल विक्रीत पदार्पण, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:44 IST2025-08-01T19:44:10+5:302025-08-01T19:44:54+5:30
Pratap Sarnaik News: उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागिदारीतून एसटी महामंडळ राज्यभरात स्वतः च्य जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी लवकरच करणार पेट्रोल-डिझेल विक्रीत पदार्पण, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
मुंबई - उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागिदारीतून एसटी महामंडळ राज्यभरात स्वतः च्य जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर अवलंबून राहणे श्रेयस्कर नाही. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. गेली ७० वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांकडून डिझेल इंधन विकत घेत आहे. सध्या २५१ ठिकाणी एसटीच्या स्वतः च्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून, या द्वारे केवळ एसटीच्या बसेस साठी डिझेल इंधनाचे वितरण होते. अर्थात , पेट्रोल पंप चालवणे आणि त्याचे देखभाल करण्याचा उत्तम अनुभव एसटी महामंडळाच्या पाठीशी आहे. त्यामुळे भविष्यात केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम असलेल्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या ऑइल विक्री करणाऱ्या कंपन्यांशी व्यावसायिक करार करून सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल व तत्सम इंधन विक्री करणारे पंप उभा करणे प्रस्तावित आहे. असे पेट्रोल पंप हे रस्त्यालगत व व्यावसायिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यभरातील एसटी महामंडळाच्या स्वतःच्या ज्या जागा आहेत, त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, अशा २५ बाय ३० मीटर जागा निश्चित करण्यात येत आहेत. या ठिकाणी एसटी महामंडळाचे केवळ इंधन विक्रीच नाही तर रिटेल शॉप देखील उभारले जाणार आहेत. त्यामुळे येथे इतर व्यवसायाला देखील पूरक संधी उपलब्ध होईल! यातून एसटी महामंडळाला सार्वजनिक भागीदारीमधून चांगला महसूलदेखील मिळू शकतो.
प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांशी राज्य शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेले एस टी महामंडळाशी व्यावसायिक भागीदारीचा करार करण्यात येईल! अर्थात , हा करार एका अर्थाने केंद्र आणि राज्य शासनाच्या दरम्यान होत असल्यामुळे मिळणाऱ्य उत्पन्नाच्या वितरणामध्ये पारदर्शकता राहील. या साठी संबंधित कंपन्यांनी राज्यभरात एस टी महामंडळाच्या सर्व जागांचे व्यावसायिक सर्वेक्षण करून २५१ ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपाचे एसटी महामंडळाच्या स्वतःच्या नव्या व्यवसायिक दृष्ट्या मोक्याच्या २५ बाय ३० मीटर जागेवर स्थलांतर केले जाईल, जिथे एस टी महामंडळाला स्वतःच्या बसेस साठी इंधन भरण्याची सोय असेल याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकाला देखील किरकोळ इंधन विक्री करणे शक्य होईल.अशा पद्धतीचे ' पेट्रो -मोटेल हब " उभा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
" भविष्यात व्यावसायिक इंधन विक्रीतून सर्वसामान्य ग्राहकाला विश्वासार्ह इंधन विक्री केंद्र एसटी महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होईल, तसेच महामंडळाला देखील उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण होईल!" - प्रताप सरनाईक