पावसामुळे एसटीला लाखोंचा फटका; ८३.५२ लाख प्रवासी सप्टेंबरच्या सुरुवातीला घटले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:23 IST2025-10-04T13:22:06+5:302025-10-04T13:23:30+5:30
महामंडळाला गेल्या तीन महिन्यांपासून मोठा तोटा सहन करावा लागत आहे. आता तर मुसळधार पावसामुळे दररोज सरासरी तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

पावसामुळे एसटीला लाखोंचा फटका; ८३.५२ लाख प्रवासी सप्टेंबरच्या सुरुवातीला घटले!
मुंबई : राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. नद्यांना आलेला पूर, रस्त्यांवर साचलेले पाणी व पूरस्थितीमुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. परिणामी, मुंबईतून ये-जा करणाऱ्या एसटी बसच्या शेकडो फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
महामंडळाला गेल्या तीन महिन्यांपासून मोठा तोटा सहन करावा लागत आहे. आता तर मुसळधार पावसामुळे दररोज सरासरी तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, असे सूत्रांनी सांगितले. ८३.५२ लाख प्रवासी सप्टेंबरच्या सुरुवातीला घटले.
अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न
मराठवाड्यातील तडाख्याचा अधिक फटका बसल्याचे स्पष्ट सांगण्यात येते. सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये एसटी महामंडळाचे ८३ लाख ५२ हजार प्रवासी कमी झाले होते. दैनंदिन उत्पन्न सरासरी ३१ कोटी ३२ लाख असून, ते अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमी झाले.
३४ कोटी रुपये मिळणे आवश्यक
एसटीला दर महिन्याचा खर्च भागविण्यासाठी अंदाजे ३४ कोटी रुपये उत्पन्न मिळणे गरजेचे आहे. परंतु, पावसाचा फटका बसला असल्याने त्यात घट झाली. ‘जोरधारां’मुळे बीड, लातूर आणि धाराशिव यांसारख्या मराठवाड्याच्या जिल्ह्यांसह सोलापूरमध्ये अनेक बस फेऱ्या दररोज रद्द करण्यात आल्या. त्यामुळे वेळापत्रकात बदल करावे लागले. या जिल्ह्यांमध्ये रस्ते, पूल वाहून गेले तर काही ठिकाणी पूर परिस्थितीमुळे रस्ते व पुलावर पाणी आले. परिणामी, अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.