Join us  

संत निवृत्तीनाथांच्या पालखीसाठी एसटीने आकारलं ७१ हजारांचं तिकीट; ठाकरे सरकार म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 6:37 PM

शासनाने विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखविल्याने परिवहन महामंडळाची असंवेदनशील कामगिरी जनतेसमोर समोर आली.

मुंबई: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाऊलीच्या भेटीसाठी शिवशाही बसमधून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने फाडले होते. त्यामुळे लोकसहभागातून कसलाही खर्च न होता होणारी निवृत्तीनाथांची पायी वारी यावर्षी मात्र सशुल्क करावी लागली. शासनाने विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखविल्याने परिवहन महामंडळाची असंवेदनशील कामगिरी जनतेसमोर समोर आली.

आम्ही दोन-तीन वेळा पत्र देऊन शासनानेच स्वखर्चाने शिवशाही बस उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केलेली होती. परंतु दोन-तीन बैठकांमध्ये महामंडळाने त्याबाबत असमर्थता दर्शविली. त्यानंतर अखेर संस्थानने प्रवासभाडे भरले असल्याचे निवृत्तीनाथ संस्थानकडून सांगण्यात आले होते. यावर आता राज्याचे परिवहन मंत्री यांनी अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल परब ट्विट करत म्हणाले की,  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदा महाराष्ट्रात आषाढी वारी होऊ शकली नाही परंतु पालखी नेण्याचा बहुमान यंदा एसटीला मिळाला. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यांच्या पालखी संदर्भात झालेली घटना ही दुर्दैवी असून गैरसमजातून घडली आहे, असं अनिल परब यांनी सांगितले. तसेच पालखीच्या प्रवासासाठी आकारण्यात आलेले शुल्क तात्काळ परत करण्याचे आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यंदा कोरोनामुळे पायी आषाढी वारीवर शासनाने निर्बंध घातले. त्यामुळे राज्यभरातील प्रमुख सात संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी शासनाकडून शिवशाही बस उपलब्ध करून दिली जाईल, असे सुरूवातीला सांगण्यात आले होते. काही संतांच्या पालखीसाठी हेलिकॉप्टरचीही चर्चा रंगली होती. त्यामुळे शासन विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देणार, असाच समज संस्थानच्या विश्वस्तांचा झाला होता. परंतु सोमवारपर्यंत शासनाकडून कसलेही आदेश प्राप्त झाला नव्हता. अखेर संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचे ७१ हजार रूपये प्रवास भाडे भरल्यानंतर मंगळवारी सकाळी महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून दिली होती. 

टॅग्स :आषाढी एकादशीउद्धव ठाकरेअनिल परबमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडी