एसटीला मालवाहतुकीतून मिळाली ‘नवसंजीवनी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 01:32 IST2020-07-27T01:32:38+5:302020-07-27T01:32:53+5:30
एक हजार वाहने वाढविणार : पार्सल वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न

एसटीला मालवाहतुकीतून मिळाली ‘नवसंजीवनी’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आर्थिक तोट्यातून बाहेर येण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतुकीकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन काळात एसटीला मालवाहतुकीतून नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे एसटीच्या ट्रकची संख्या वाढविण्याची मोहीम एसटीने हाती घेतली आहे. यातून पुढील तीन महिन्यांत १ हजार वाहनांचा ताफा मालवाहतुकीस सज्ज करण्याचा एसटीचा मानस आहे. यासह एसटी महामंडळ मालवाहतुकीनंतर पार्सल वाहतुकीमध्ये प्रवेश करण्यासाठी विचाराधीन आहे.
मागील अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने एसटीचे उत्पन्न आणखीन घटले. मात्र एसटीची मालवाहतूक सुरू झाल्याने आर्थिक गणित सांभाळण्यास मदत होत आहे. एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी ट्रकची संख्या वाढविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. एसटीने ६०५ प्रवासी वाहनांच्या रूपांतरणासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. तर, ३८० वाहनांचे ट्रकमध्ये रूपांतरण करण्याचे काम सुरू केले आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० पर्यंत मोफत धान्याचे वाटप केले जाणार आहे. या योजनेंतर्गत सुमारे १ हजार टन धान्याची वाहतूक केली जाते. रायगड विभागाने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मालवाहतूक केली आहे. भंडारा, रत्नागिरी वनविभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रोपांची वाहतूक करत आहे. राज्यातील प्रत्येक विभागाने अशा प्रकारच्या नव्या कल्पना राबवून मालवाहतुकीस चालना देण्याच्या सूचना एसटी महामंडळाने दिल्या आहेत.
दोन महिन्यात ३.१५ कोटींचे उत्पन्न
२० मे ते २० जुलै या दोन महिन्यांत एसटीच्या मालवाहतुकीच्या गाड्यांच्या एकूण ६ हजार ५१२ फेºया झाल्या आहेत. या मालवाहतुकीत एसटीला ३ कोटी १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. महामंडळाला दररोज सरासरी ५ ते १० लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. आॅगस्ट २०२० पर्यंत हे उत्पन्न दररोज २५ लाखांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. तर, येणाºया वर्षात १ हजार वाहनांद्वारे मालवाहतुकीतून दररोज १ हजार कोटी उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.
एसटी महामंडळाच्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालवाहतुकीच्या वाहनांची ज्याप्रमाणे मागणी वाढत जाईल, त्याप्रमाणे वाहनांत वाढ करण्यात येणार आहे. एसटी महामंडळ पार्सल वाहतुकीसाठी विचाराधीन आहे.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ