एसटी कंडक्टरने काढली महिला प्रवाशाची छेड; कर्तव्यावरील वाहकाला संतप्त प्रवाशांची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 07:04 IST2025-04-10T07:04:13+5:302025-04-10T07:04:51+5:30
बस मैत्री मार्क भागात येताच त्याने पहिल्या सीटवर बसलेल्या तरुणीचा हात धरून असभ्य वर्तन केले.

एसटी कंडक्टरने काढली महिला प्रवाशाची छेड; कर्तव्यावरील वाहकाला संतप्त प्रवाशांची मारहाण
मुंबई : स्वारगेट बस स्टॅन्डवर बसमधील बलात्काराची घटना ताजी असतानाच मुंबईहून मालोशीला निघालेल्या एसटीतून प्रवास करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीची त्याच बसमधील कर्तव्यावर नसलेल्या एका वाहकाने छेड काढल्याची घटना मंगळवारी रात्री चेंबूरच्या मैत्री पार्क येथे घडली.
तरुणीने आरडाओरडा करताच वाहकाने पळ काढला. तर, त्याला पळू का दिले, असा जाब विचारत संतप्त प्रवाशांनी कर्तव्यावरील वाहक मनेश तायडेला मारहाण केली. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी आरोपी वाहक विलास वाल्मिक मुंडेविरुद्ध गुन्हा नोंदवून तो भोईवाडा पोलिसांकडे वर्ग केला आहे.
मालोशीला जाणारी एसटी बस (एमएच १३ सीयु ८५९४) मुंबई सेंट्रल आगारातून मंगळवारी रात्री साडे आठला सुटली. कर्तव्य बजावून घरी निघालेला आरोपी वाहक मुंडे याच बसमधून प्रवास करत होता. बस मैत्री मार्क भागात येताच त्याने पहिल्या सीटवर बसलेल्या तरुणीचा हात धरून असभ्य वर्तन केले. तिने आरडाओरडा करताच कंडक्टरने सिग्नलवर उतरून पळ काढला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कदम यांनी सांगितले.
एसटीचा वाहक निलंबित
एसटी बसमध्ये तरुणीला छेडणाऱ्या विलास वाल्मिक मुंडे या वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. मुंडे ड्युटीवर नव्हता, तर तो त्या बसने प्रवास करत होता. दारूच्या नशेत असलेल्या मुंडेने तरुणीची छेड काढली आणि बसमधून उतरून तो पळाला. त्यामुळे बसमधील संतप्त प्रवाशांनी ड्युटीवर असलेल्या कंडक्टरला मारहाण केली, असे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटीत सीसीटीव्ही बसवणार
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कंडक्टरला तत्काळ निलंबित केले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नव्या-जुन्या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, असे एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितले.