"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:22 IST2025-07-16T17:13:02+5:302025-07-16T17:22:43+5:30
अंबादास दानवेंच्या निरोपसमारंभात बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली

"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ २९ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानिमित्ताने अंबादास दानवे यांचा निरोपसमारंभ विधानपरिषदेत आयोजित करण्यात आला. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनी भाषणं केली. यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचा अभिमान असल्याचे म्हटलं. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला. ज्यांनी ताट वाढून दिलं त्या पक्षाशी काही जणांनी प्रतारणा केली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपसमारंभात बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. अंबादास दानवेंच्या उमेदवारीला विरोध करणारेच आज त्यांचं कौतुक करत आहेत, हे पाहून आनंद झाला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही माझ्याकडून काही लोक घेतले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
"अंबादास दानवे हे त्यांचा या सभागृहातील पहिला कार्यकाळ पूर्ण करत आहेत. यानिमित्त त्यांनी आज सभागृहात मी पुन्हा येईन असं जोरात बोललं पाहिजे. कारण त्याला महत्त्व आहे. फक्त आहे त्याच पक्षातून असंही बोला. आज अनेकजण अंबादास दानवे यांचं कौतुक करत आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी मी दानवे यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांचे चेहरे वेगळे होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी अत्यंत मोकळेपणाने व जाहीरपणे त्यांचे आभार मानतो. मी प्रांजळपणे कबूल करतो की भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता तुम्ही मला दिलात आणि मी तो आमच्या पक्षात घेतला. मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, तसे ते माझे आभार मानू शकतील की नाही हे मला माहिती नाही. कारण माझ्याकडून त्यांनी काही लोक घेतले आहेत," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"शिवसेनाप्रमुखांना देखील त्यांचा अभिमान वाटत असेल, काहीशी हळहळही वाटत असेल. सहाजिक आहे की आपण किती शिकलो यापेक्षा आपण काय शिकलो याला अधिक महत्त्व आहे. त्याचा जममाणसांसाठी काय उपयोग करून देतो हे देखील महत्त्वाचं आहे. पदं येतात आणि जातात. पण शेवटी जनतेच्या मनात आपली काय प्रतिमा राहते हेच आपल्या आयुष्याचे फलित आहे. अनेकजण पद मिळण्यासाठी फडफडत असतात. अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली नाही. ज्यांनी ताट वाढून दिलं त्या पक्षाशी तुम्ही प्रतारणा केली नाही," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढला.
उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचा स्कोप, विचार करता येईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर ऑफर दिली. "उद्धवजी आता २०२९ पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.