निर्बंध शिथिल हाेताच रस्त्यांवर, दुकानांत वाढली मुंबईकरांची गर्दी; ठाणे, पालघरमध्ये बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 05:54 AM2021-06-08T05:54:59+5:302021-06-08T05:55:41+5:30

ठाण्यात, पालघरमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी बाजारांत गर्दी केल्याने निर्बंध धाब्यावर बसविल्याचे चित्र दिसत होते. तर दुसरीकडे नवी मुंबईमध्ये मॉल्ससह हॉटेल पुन्हा सुरु करण्यात आली होती.

As soon as the restrictions were relaxed, the crowds of Mumbaikars increased in the streets and shops; Almost shopping in the markets in Thane, Palghar | निर्बंध शिथिल हाेताच रस्त्यांवर, दुकानांत वाढली मुंबईकरांची गर्दी; ठाणे, पालघरमध्ये बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग

निर्बंध शिथिल हाेताच रस्त्यांवर, दुकानांत वाढली मुंबईकरांची गर्दी; ठाणे, पालघरमध्ये बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग

googlenewsNext

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध सोमवारपासून मुंबई शहर आणि उपनगरात शिथिल करण्यात आले आणि सुमारे दीड महिन्यांनी मोकळीक मिळालेल्या नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी केली. बाजारपेठा, सार्वजनिक वाहतुकीसह आवश्यक गाेष्टींच्या खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. नागरिकांना आवरताना प्रशासनाच्या मात्र नाकीनऊ आले होते.

ठाण्यात, पालघरमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी बाजारांत गर्दी केल्याने निर्बंध धाब्यावर बसविल्याचे चित्र दिसत होते. तर दुसरीकडे नवी मुंबईमध्ये मॉल्ससह हॉटेल पुन्हा सुरु करण्यात आली होती. मॉलमध्ये प्रवेश करताना तापमान तपासूनच प्रवेश देण्यात येत होता. 
   स्तर तीनमध्ये असलेल्या मुंबई महापालिकेने अनलॉकनुसार मुंबईकरांना सोमवारी मोकळीक दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्गासह उर्वरित प्रमुख रस्ते रोजच्या तुलनेत सोमवारी भरभरून वाहत होते. 

‘रेस्टॉरंटमध्ये डाईन इन रात्री ११ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्या’ 
मुंबई : वेळेच्या निर्बंधांमुळे रेस्टॉरंटच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने रेस्टॉरंटमध्ये डाईन इन रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्या अशी मागणी हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सायंकाळी ४ वाजेपर्यंतच ही परवानगी देण्यात आल्यामुळे पहिल्याच दिवशी केवळ १८ टक्के रेस्टॉरंट खुले ठेवण्यात आले होते. रेस्टॉरंटचा ८० टक्के व्यवसाय हा सायंकाळनंतरच होतो. . सध्या जी वेळेची बंधने घालण्यात आली आहेत, यामुळे रेस्टॉरंट व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे सरकारने रेस्टॉरंट अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.

नवी मुंबईत मॉल्स, हॉटेल सुरु
नवी मुंबई : रुग्ण संख्या नियंत्रणात आल्यामुळे नवी मुंबईमधील सर्व दुकाने पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी शहरातील मॉल्समध्ये गर्दी नियंत्रणात होती. हॉटेलमध्येही गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात होती. परंतु इतर खाद्य पदार्थ विक्रीच्या दुकानांबाहेर गर्दी होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. नागरिकांनी नियमांचे पालन करून पुन्हा रुग्ण वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नवी मुंबईमध्ये जवळपास दोन महिन्यानंतर सर्व माॅल पुर्णक्षमतेने सुरु करण्यात आले आहेत. सीवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉलमधील बहुतांश दुकाने सुरु करण्यात आली होती. मॉलमध्ये प्रवेश करताना तापमान तपासून सोडण्यात येत होते.

ठाण्यात निर्बंध बसविले धाब्यावर
ठाणे : राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर सोमवारी अनलॉकच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी ओसंडून वाहिली. कोर्ट नाका ते रेल्वेस्थानकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन कुठेही झाले नाही. लोकल प्रवास अद्यापही बंद असल्याने शहराच्या विविध भागांत वाहतूककोंडी झाली होती. आसलूनमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात असल्याचे दिसत होते. कल्याण-डोंबिवलीच्या तिसऱ्या स्तरात समावेश असल्याने शहरातील दुकाने आणि आस्थापना दुपारी चारनंतर बंद करण्यात आल्या. 

पालघरमध्ये खरेदीसाठी बाजारांत गर्दी  
पालघर : जिल्ह्यात काही शर्ती-अटीवर अनलॉक जाहीर झाल्यानंतर नागरिकांनी खरेदीसाठी बाजारांत गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. भाजी मार्केट, प्लास्टिक कपडा, हार्डवेअर साहित्य, सर्व्हिस स्टेशन आदी दुकानांना गिऱ्हाइकांनी पसंती दिल्याचे पाहावयास मिळाले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी विविध अवजारे तसेच अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारांत गर्दी केली होती. तलासरी तालुक्यात सोमवार बाजार भरत असल्याने रस्त्यावरही बाजार भरला होता. 

अनलॉकमुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढला 
मुंबई : अनलॉक होताच मुंबईतल्या वाशी, दहिसर टोल नाक्यासह मुंबईच्या प्रवेशद्वारावर वाहनांची गर्दी पहावयास मिळाली. अशात नाकाबंदी करत वाहन तपासणीमुळे पोलिसांना नाकीनउ आलेले पहावयास मिळाले.
तब्बल अडीच-तीन महिन्यांनंतर सोमवारी मुंबईसह राज्यभरातील लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे. यामध्ये दुसऱ्या स्तरात समावेश असलेल्या मुंबईत सोमवारी लॉकडाऊन उघडताच सकाळपासून नागरिकांनी कामानिमित्त बाहेर पडण्यास सुरुवात केली.
मुलुंड टोल नाक्यासह आनंद नगर, वाशी, दहिसर टोल,ऐरोली अशा मुंबईच्या प्रवेशद्वाराबाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळाल्या. 
सोमवारी मुंबई पोलिसांकड़ून नाकाबंदी करत वाहन तपासणी सुरु होती. पोलिसांची दमछाक होताना दिसले. विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना घरी धाडण्यात आले. तसेच विनाकारण गर्दी करू नका असे आवाहनही पोलिसांकड़ून करण्यात येत आहे. 

वेळ अपुरी, प्रवासाची साधने नाहीत, पण व्यवसाय सुरू झाला
मुंबई : कोरोनाचा कहर काही प्रमाणात कमी झाल्यानंतर आता सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. याआधी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ यावेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. व्यापारी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

ऑफिसला लागला लेटमार्क
मी सकाळी ८.३० वाजता बससाठी रांग लावली. पाच बस गेल्यानंतर माझा नंबर लागला. यात दीड तास वाया गेल्याने ऑफिसला लेटमार्क लागला. बेस्टमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून किमान १० ते १५ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतात. प्रशासनाने त्याला परवानगी देण्यास काहीच हरकत नाही.
- ज्योती कदम, मुलुंड

वर्दळीच्या मार्गावर लागोपाठ बस
घाटकोपर स्थानकाबाहेरून वर्दळीच्या मार्गावर लागोपाठ बस सोडण्यात येतात. सीट भरल्या नसल्या तरी बस सोडल्या जातात. त्या तुलनेत इतर मार्गांवरील फेऱ्या मर्यादित करण्यात आल्या आहेत. एक-दीड तास बस येत नसल्यामुळे लांबलचक रांगा लागत आहेत. फेऱ्यांचे नियोजन करणाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.
- सुनील गोठोस्कर, घाटकोपर

बस आधीच भरून येते, आम्ही कुठे बसायचे?
साकीनाक्याहून थेट बस सुटत नाही. ज्या बस येथे येतात त्या आधीच भरलेल्या असतात. त्यात उभ्याने प्रवास करू दिला जात नसल्याने रिकाम्या बसची वाट पाहत तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. बस लवकर येत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
- केदार पवार, साकीनाका

दुकाने खुली व बंद करण्यास घालून दिलेली वेळ चुकीची आहे. दूध, किराणामाल यांसारखी दुकाने लवकर उघडता येऊ शकतात. मात्र कपडे तसेच इलेक्ट्रॉनिक व हार्डवेअर यांसारखी दुकाने ११ वाजता उघडली जातात. त्यात रेल्वे प्रवासाची परवानगी नाही व अपुरी दळणवळणाची साधने यामुळे व्यापाऱ्यांना दुकानावर पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे अशी दुकाने ४ वाजता बंद केल्यास त्याचा दुकानदारांना काहीच फायदा होणार नाही. सरकार अशा प्रकारचे निर्णय घेताना तळागाळातील लोकांचा विचार करत नाही. व्यापाऱ्यांच्या अडचणी अद्याप सरकारला समजलेल्याच नाहीत.
-  अनिल फोंडेकर, अध्यक्ष, 
मुंबई व्यापारी असोसिएशन)

दोन महिन्यांनंतर सरकारने दुकान उघडण्यास परवानगी दिल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इतके दिवस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला अद्यापही पूर्ण वेळ दुकाने उघडण्यास परवानगी नाही. वेळेची बंधने आहेत. त्यात सार्वजनिक वाहतुकीवरदेखील प्रवासाचे निर्बंध आहेत. असे असले तरी काहीतरी जुळवाजुळव करून दुकाने सुरू ठेवावी लागणारच आहे.
  - दत्तात्रय तावरे, दुकानदार, देवनार

सरकारने अनलॉक केल्यानंतर लोकल प्रवासाचीही मुभा द्यायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. दुकाने खुली करण्यास परवानगी दिल्यामुळे आता व्यवसाय पुन्हा एकदा रुळावर आणायचा आहे. यासाठी दुकानातील कर्मचारीही नियमित दुकानावर पोहोचायला हवा, केवळ बस, रिक्षा व टॅक्सी यातून दररोज प्रवास करणे अडचणीचे आहे. त्यामुळे दुकानातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यायलाच हवी.
- अभयराज कुशवाह, दुकानदार, कुर्ला

Web Title: As soon as the restrictions were relaxed, the crowds of Mumbaikars increased in the streets and shops; Almost shopping in the markets in Thane, Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.