Kurla Best Bus Accident : कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले आहेत. कुर्ला परिसरात झालेल्या या अपघातात एका अनियंत्रित बेस्ट बसने अनेक वाहने आणि लोकांना चिरडले होते. ५५ वर्षीय कनिज फातिमा यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. कनीज फातिमा या रुग्णालयात काम करण्यासाठी ड्युटीवर जात होता. याप्रकरणी बस चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. तर या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता कोणाच्या चुकीची शिक्षा कोणा दुसऱ्याला मिळावी हे प्रशासनाचे अपयश असल्याचे कनिज फातिमा यांच्या मुलाने म्हटलं आहे.
कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघातात कनीज फातिमा यांचाही मृत्यू झाला. त्याचा मुलगा आबिदच्या म्हणण्यानुसार, त्याची आई कुर्ल्यातील रुग्णालयात काम करते आणि त्या रात्री नाईट ड्युटीवर जात होती. वाटेत बेस्टच्या बसने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. आबिद यांनी शासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. तसेच ही एका माणसाची चूक नाही असाही आरोप आबिद यांनी केला आहे.
"माझ्या आईचे नाव कनिज फातिमा होतं. त्यांची कामावार जाण्याची वेळ आठ वाजताची होती. तिथेच जवळ एका हॉस्पिटलमध्ये ती कामाला होती. तिने मी एक तास थोड्या गप्पा मारुन जाते असं सांगितले. नऊ वाजता ती घरातून निघाली आणि त्यानंतर अर्ध्या तासाने आम्हाला फोन आला की हा मोबाईल कोणाचा आहे. त्यांना तो माझ्या आईचा फोन असल्याचे सांगितले. त्यावेळी समोरुन लगेच इथे या अपघात झाला आहे असं आम्हाला सांगितले. आम्ही तिथे जाऊन पाहिलं तर तिथे गोंधळ सुरु होता. आम्ही जाऊन शोधाशोध केली तेव्हा माझी आई बस आणि कारच्या मध्ये दबली गेली होती. तिचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी तिचा मृतदेह भाभा रुग्णालयात नेला होता. मी पाहिले तेव्हा तिच्या हातात, गळ्यात दागिने होते. अर्ध्या तासाने पाहिलं तर तिच्या कानातील गायब होतं," असं कनिज फातिमा यांचा मुलगा आबिद शेख याने सांगितले.
"मी बातमी पाहिली की बसचा ड्रायव्हर १ डिसेंबर पासून कामावर रुजू झाला होता. त्याला तेवढे प्रशिक्षण दिलं गेलं नव्हतं. बेस्ट नव्या लोकांना कंत्राटीपद्धतीने कामावर घेत आहे आणि त्यांना प्रशिक्षण देत नाहीये. बस जेव्हा डेपोमधून बाहेर पडते तेव्हा तिची तपासणी होत नाही का. आता सगळ्या इलेक्ट्रिक बस आहेत त्यामुळे त्यात काही बिघाड होणार असेल तर लगेच कळतो. हा हलगर्जीपणा कोणी केला आहे. ही एका माणसाची चूक नाही," असेही आबिद शेख म्हणाला.
"तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये देत आहाता. मी पाच तुम्हाला परत देतो त्यातून तुम्ही थोड्या सुधारणा करा. कोणाच्या चुकीची शिक्षा कोणा दुसऱ्याला मिळावी हे प्रशासनाचे अपयश आहे," असंही कनिज फातिमा यांच्या मुलाने म्हटलं.