दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:58 IST2026-01-08T19:58:27+5:302026-01-08T19:58:57+5:30
Mumbai News: कधी कधी एखाद्या चुकीमुळे लोकांचे शेअर बाजारात लाखो रुपये बुडाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण इथे एकाने केलेल्या तांत्रिक चुकीमुळे दुसरी व्यक्ती अवघ्या २० मिनिटांत करोडपती बनल्याची अजब घटना मुंबईत घडली आहे. तसेच हे प्रकरण कोर्टातही गेल्याने गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे.

दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
कधी कधी एखाद्या चुकीमुळे लोकांचे शेअर बाजारात लाखो रुपये बुडाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण इथे एकाने केलेल्या तांत्रिक चुकीमुळे दुसरी व्यक्ती अवघ्या २० मिनिटांत करोडपती बनल्याची अजब घटना मुंबईत घडली आहे. तसेच हे प्रकरण कोर्टातही गेल्याने गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील गजानन राजगुरू यांचं कोटक सिक्युरिटीमध्ये डीमॅट अकाऊंट होतं. तसेच ते शेअर बाजारामध्ये ट्रेड करायचे. मात्र एकदा कोटक सिक्युरिटीच्या एका चुकीमुळे गजानन राजगुरू यांच्या खात्यात अचानक ४० कोटी रुपये आले. त्याचवेळी त्यांनी या पैशांचा फायदा घेत ते फ्युचर्स अँड ऑपशन्समध्ये ट्रेड करून सुमारे २.३८ कोटी रुपयांची कमाई केली.
ही घटना २०२२ मध्ये घडली होती. खरंतर हा ट्रेड करत असताना सुरुवातीला त्यांना ५४ लाख रुपयांचं नुकसान झालं. मात्र नंतर त्यांनी आपली रणनीती बदलून तोट्याती व्यवहाराला काही मिनिटांमध्ये २.३८ कोटी रुपयांच्या नफ्यामध्ये आणले. त्यामुळे राजगुरू यांना सर्व प्रकारचे कर आणि खर्च वगळून सुमारे १.७५ कोटी रुपयांचा फायदा झाला.
मात्र कोटक सिक्युरिटीला आपल्या चुकीची माहिती होताच त्यांनी हे ४० कोटी रुपये गजानन राजगुरू यांच्या खात्यामधून वळवून परत घेतले. त्यानंतर कोटक सिक्युरिटीने या रकमेमधून राजगुरू यांना मिळालेल्या १.७५ कोटी रुपयांच्या नफ्याचीही मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. तिथे सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने कोटक सिक्युरिटीची मागणी चुकीची असल्याचे सांगितले. तसेच ट्रेडरने हा नफा आपलं कौशल्य आणि जोखिम पत्करण्याच्या क्षमतेद्वारे कमावल्याचे स्पष्ट केले.
हे संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याच्या श्रेणीत येत नाही असे सांगितले. दरम्यान, कोटक सिक्युरिटीने याबाबत पुन्हा अपील केले आहे. त्यावर आता २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. मात्र तोपर्यंत हे १.७५ कोटी रुपये आपल्याकडे ठेवण्याची परवानगी कोर्टाने राजगुरू यांना दिली आहे.