Join us

भाजपमधील काही नेते बंडाच्या पवित्र्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 06:25 IST

बाळासाहेब थोरात यांचा दावा; युतीचे काही नेते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात

अतुल कुलकर्णी मुंबई : ज्या जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार, नेते व प्रमुख कार्यकर्ते भाजप-शिवसेनेत गेले आहेत, त्या ठिकाणच्या भाजप-सेनेचे नेते काँग्रेसच्या संपर्कात असून लवकरच भाजपमध्ये मोठे बंड होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

भाजप-शिवसेनेत बाहेरुन आयात केलेल्या नेत्यांमुळे युतीचे स्थानिक नेते चिंतेत आहेत. आयारामांमुळे आपली संधी हुकेल, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणातून अनेक विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील भाजपने अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे देशात कापली होती. तो इतिहास लक्षात घेता आपल्यालाही बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, अशी भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळे आपली जागा सुरक्षित करून घेण्यासाठी भाजप-शिवसेनेचे काही आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे थोरात यांनी सांगितले. आघाडीत येऊ इच्छिणाऱ्या आमदारांना जागा सोडण्यावर दोन्ही पक्षाच्या बैठकीत चर्चा झाल्याचेही ते म्हणाले.

निष्ठावंतांना डावलले; नवख्यांना जवळ केले!भाजपने विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, प्रकाश मेहता, एकनाथ खडसे या निष्ठावान आणि बहुजन समाजाजातील नेत्यांना खड्यासारखे बाजूला केले आहे. तर प्रसाद लाड, परिणय फुके, प्रवीण दरेकर या नवख्यांना मुख्यमंत्र्यांनी जवळ केले आहे. यामुळे भाजपत मोठी खदखद आहे. अनेक नेते आम्हाला खासगीत सांगत आहेत. भाजपमधील जातीयतेविरोधात काही नेते बंडाच्या पवित्र्यात असल्याचा दावाही थोरात यांनी केला.

टॅग्स :भाजपाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस