Join us  

...म्हणून नावाआधी जोडलेला 'चौकीदार' शब्द हटवला; पंकजा मुंडेंनी सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 5:00 PM

माझ्यासाठी एक प्लॅन्टेड वर्ग सोशल मीडियावर बसलेला असतो. मी काय करते अॅक्टीव्हिटी हे तो वर्ग पाहात असतो.

मुंबई - मोदींच्या संकल्पेनेतील चौकीदार या शब्दानुसार मीही चौकीदार पंकजा मुंडे असं नाव केलं होतं. मात्र, त्यानंतर ज्या पद्धतीनं टोल्स सुरू झाले, त्यामुळे मला असं वाटलं की, माझ्यामुळे या संकल्पनेला त्रास होऊ नये, असे मला वाटले. त्यामुळे मी ते विड्रॉ केलं, असे पंकजा मुंडे यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या 'चौकीदार चोर है' या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरुन उत्तर दिलं. त्यानंतर, देशभरातील भाजपा नेत्यांकडून चौकीदार हे नाव आपल्या नावापुढे लावण्यात आले आहे.  

माझ्यासाठी एक प्लॅन्टेड वर्ग सोशल मीडियावर बसलेला असतो. मी काय करते अॅक्टीव्हिटी हे तो वर्ग पाहात असतो. जेव्हा तुम्ही प्रमुख नेत्या म्हटलात, तेव्हा मोदीजींच्या या संकल्पनेला कॅम्पेन अफेक्ट होऊ द्यायचा नाही. त्यामुळे मी ते नाव हटवलं, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. मी एखादी गोष्ट म्हंटली आणि ती गोष्ट 10 टक्के लोकांना जरी नाही पटली, तर मी त्याचा विचार करते. त्यामुळेच मला आवश्यक वाटलं की तो टॅग लावावा. त्यामुळे या कॅम्पेनवर विनाकारण चुकीचा परिणाम होऊ नये, याची काळजी घेण्याचा प्रयत्न मी केला, असे पंकजा मुंडे यांनी एका वेबसाईटसाठी दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या 'चौकीदार चोर है' या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरुन उत्तर दिलं. मोदींनी त्यांच्या ट्विटरवरील नावापुढे चौकीदार शब्द लावला. त्यानंतर भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी, खासदारांनी, नेत्यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला. मोदींच्या समर्थकांनीही त्यांच्या नावापुढे हा शब्द जोडत त्यांना समर्थन दिलं. त्यानंतर ट्विटरवर हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. 

पंतप्रधान मोदींनी नावापुढे चौकीदार लावल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी लगेच ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला. त्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेकांनी याचं अनुकरण केलं. राज्याच्या पातळीवरही हाच ट्रेंड दिसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लिहिला. भाजपाच्या इतर मंत्र्यांनीही हे कॅम्पेन फॉलो केलं. मात्र, ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लिहिला नाही. पण, पंकजा मुडेंच्याही सोशल मीडिया टीमने चौकीदार पंकजा मुंडे असे लिहिले होते. मात्र, ट्रोल्स झाल्यानंतर मी ते हटविले, असे पंकजा यांनी सांगितले.  

दरम्यान, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लावला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, पर्यावरणमंत्री प्रवीण पोटे यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला आहे. मात्र, पंकजा मुंडेंसह पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनीही त्यांच्यापुढे चौकीदार शब्द जोडलेला आहे.

टॅग्स :पंकजा मुंडेनरेंद्र मोदीदेवेंद्र फडणवीसभाजपाट्विटरट्रोल