...तर आमची स्वबळाची तयारी, महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 09:17 IST2025-01-13T09:17:21+5:302025-01-13T09:17:57+5:30

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा उद्धव सेनेचा विचार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष सावध झाले आहेत. 

...So our self-reliance preparation, the role of Congress, NCP for the municipal elections | ...तर आमची स्वबळाची तयारी, महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका

...तर आमची स्वबळाची तयारी, महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी उद्धवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा मानस खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्यानंतर  महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटानेही स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी संपुष्टात येण्याची शक्यता गडद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा उद्धव सेनेचा विचार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष सावध झाले आहेत. 

 यासंदर्भात मुंबई काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानेही आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, आमचीही तयारी सुरू आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत. दुसरीकडे महायुतीत सुद्धा एकत्र लढण्याविषयी शिंदेसेना आग्रही असली तरी भाजप त्याला फारसा प्रतिसाद देताना दिसत नाही.  त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उतरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विरोधात लढायची सवय 
२०१९ पर्यंत शिवसेनेच्या विरोधातच निवडणुका लढविल्या आहेत. २०१९ मध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आम्ही एकत्र आलो. मात्र, पुन्हा शिवसेनेच्या विरोधात लढायचे असेल तर आमची तयारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आघाडी करायची की नाही याचे अधिकार जिल्हा व तालुकापातळीवरील नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी आघाडी आवश्यक आहे त्या ठिकाणी वेगळा निर्णय होईल. मात्र, जिथे आवश्यकता नाही तिथे स्वबळावर निवडणुका लढविल्या जातील. आघाडीतील घटक पक्ष जर पालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असतील तर निश्चितच आमचीही स्वबळावर लढायची तयारी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ता महेश तपासे यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळावी ही आमच्या पक्षाचीही भूमिका आहे. मुंबईतील आमच्या स्थानिक नेत्यांच्या भावना आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत. त्यानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबईसह राज्यभरात कशा लढवायच्या याचा निर्णय घेतला जाईल. मात्र आघाडीमध्ये कोणताही निर्णय घेताना चर्चा करून घेतला गेला पाहिजे. परस्पर कोणी निर्णय जाहीर करत असेल तर मग आम्हालाही  निर्णय घेता येईल. 
    - खा. वर्षा गायकवाड, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस 

Web Title: ...So our self-reliance preparation, the role of Congress, NCP for the municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.