Join us

मग 'ही' महाराष्ट्राची संस्कृती आहे का?; भाजपाचा राष्ट्रवादी-शिवसेनेला सवाल, काँग्रेसवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:21 IST

उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटके ठेऊन साक्षीदाराचा खून करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण करणे, जनादेशाचा अपमान करून आणि विश्वासघात करून सरकार स्थापन करणे अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करत भाजपाने महाविकास आघाडीच्या नेत्यांना धारेवर धरलं.

मुंबई – गेल्या ५ महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र शुक्रवारी अचानक काही संतप्त आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हल्ला केला. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्यासाठी गुणरत्न सदावर्ते आणि भाजपा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनीही या हल्ल्याची चौकशी करावी. अशाप्रकारे हल्ला होणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र महाविकास आघाडीचे नेते वारंवार ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका करत आहेत. त्यावर भाजपानेही महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवाल केला आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला तो दुर्देवीच आहे. या प्रकारामागे कोण हे पोलीस शोधून काढतीलच. ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे सांगत अचानक अनेकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे उमाळे दाटून आलेत. खरं आहे नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नक्कीच नाही पण याची सुरूवातच काँग्रेस नेत्यांनी केली. भाजपा नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणारे कोण होते? एखाद्या मंत्र्याच्या विरोधात कोणी फेसबुक पोस्ट केली म्हणून मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन त्याला मारहाण करणे. पोलिसाला मारहाण केली म्हणून न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तीला मंत्रिपदी कायम ठेवणे. दाऊदशी संबंधित गुन्हेगारांशी आर्थिक व्यवहाराच्या आरोपामुळे अटक होऊन तुरुंगात असलेला नेता मंत्रिपदी कायम ठेवणे. मंत्र्याने पोलिसांना बोलावून महिना शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचा आदेश देणे. काळ्या पैशावर कारवाई म्हणून ज्याची संपत्ती जप्त झाली त्याचे वाजतगाजत स्वागत करून मिरवणूक काढणे. राज्यपालांना सरकारी विमानातून उतरवणे याचा उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटके ठेऊन साक्षीदाराचा खून करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण करणे. सरकारी वकिलाच्या पुढाकाराने खोटे पुरावे तयार करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना गोवणे. बदल्यांमधील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर त्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी भ्रष्टाचार उघड करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हेगार ठरविणे. जनादेशाचा अपमान करून आणि विश्वासघात करून सरकार स्थापन करणे. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते ही अनेक वर्षाची परंपरा आहे. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना पंढरपुरात महापूजेपासून रोखणं ही सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती नाही असा टोला भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांना लगावला आहे.

टॅग्स :भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसशिवसेनाशरद पवार