Join us

...म्हणून राष्ट्रवादीसोबत आहे; हीच ती वेळ म्हणत भाजपा आमदाराच्या ट्विटने माजली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 15:52 IST

शिवाजी महाराजांची जयंती मराठी तिथीप्रमाणेच साजरी करायला हवी ही शिवसेनेची भूमिका आहे

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय तारखेनुसार जयंती १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते मात्र शिवसेनेकडून दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. त्यामुळे यंदा राज्यातील सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावणारी शिवसेना तारखेनुसार की तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तिथीचा हट्ट सोडा अन् १९ फेब्रुवारीला शिवजयंती जाहीर करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे. 

राष्ट्रवादीच्या या आवाहनानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेनेला टोला लगावला आहे. राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झाली पाहिजे, एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मिटवून टाकाच. एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे. हीच ती वेळ, जय शिवराय असं म्हणत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 

शिवजयंतीच्या तारखेवरुन वाद हा नवा नाही. दरवर्षी शिवसेनेकडून १९ फेब्रुवारीऐवजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. मागील सरकारमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी केली होती. इतकचं नाही तर शिवसेनेचे माजी खासदार यांनी चंद्रकांत खैरै यांनी सांगितले होते की, शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी इंग्रज भारतात नव्हते. त्यामुळे इंग्रजी पद्धतीने कालगणनाही केली जात नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंती मराठी तिथीप्रमाणेच साजरी करायला हवी ही शिवसेनेची भूमिका आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. 

२०१८ मध्ये शिवजयंतीच्या या तारखेवरुन शिवसेना आणि अन्य मराठा संघटनांमध्ये औरंगाबाद येथे मारहाणीचा प्रकारही घडला होता. शिवजयंती १९ फेब्रुवारीला तारखेनुसार साजरी केली जात असताना शिवसेना नेत्यांकडून तिथीचा घोळ घालून वेगळी जयंती साजरी करण्याचा घाट घातला जातो. हा शिवरायांचा अवमान आहे त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचं बंद करावं अशी मागणी आमदार नितेश राणेंनी केली होती. राज्यातील सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रितपणे सरकारमध्ये आहेत. त्यामुळे शिवजयंतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे आहे.  

टॅग्स :नीतेश राणे शिवजयंतीशिवसेनाउद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेस