शिवशाही बसमधून धूर; ४८ प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 06:37 IST2025-11-09T06:08:05+5:302025-11-09T06:37:54+5:30
Shivshahi Bus News: दादरहून पुण्याला निघालेल्या शिवशाही बसच्या एसी डक्टमधून धूर निघाल्याची घटना महड येथे शनिवारी सायंकाळी घडली. यावेळी पाठीमागून येत असलेल्या पोलिस टोईंग वाहनामधील कर्मचाऱ्यांनी बसच्या दरवाजाची काच फोडून वात ते तीन प्रवाशी सुखरूप बाहेर काढले.

शिवशाही बसमधून धूर; ४८ प्रवासी सुखरूप
मुंबई - दादरहून पुण्याला निघालेल्या शिवशाही बसच्या एसी डक्टमधून धूर निघाल्याची घटना महड येथे शनिवारी सायंकाळी घडली. यावेळी पाठीमागून येत असलेल्या पोलिस टोईंग वाहनामधील कर्मचाऱ्यांनी बसच्या दरवाजाची काच फोडून वात ते तीन प्रवाशी सुखरूप बाहेर काढले, तर उर्वरित प्रवासी दरवाज्याने खाली उतरले. या घटनेत सर्व ४८ प्रवासी सुखरूप असून, त्यांना पाठीमागून येणाऱ्या बसमधून रवाना करण्यात आले.
एसटी महामंडळाच्या परळ आगारातून बस क्रमांक एमएच ०६ बीडब्ल्यू २७३७ ही शिवशाही बस चालक मेहेबूब मकबूल नदाफ हे दादर ते पुणे प्रवासासाठी निघाले होते. परळ आगारातून ही बस दादर येथे आली. विनावाहक असलेली ही बस दादर येथून ५:३० वाजता ४८ प्रवाशांना घेऊन दादर ते पुणे या मार्गावर मार्गस्थ झाली. महड ब्रिजवर ६ वाजता बस आली असता तिच्या एसी डक्टमधून धूर येऊ लागला. त्यानंतर चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. मागून येणाऱ्या पोलिस टोईंग वाहनातील कर्मचाऱ्यांनी बसमधील धूर पाहून इमर्जन्सी दरवाजाची काच फोडून बसमधील दोन-तीन प्रवासी यांना बाहेर काढले. अन्य प्रवासी बसच्या दरवाज्यातून उतरून बाहेर आले. बसमधील कुणालाही दुखापत झाली नाही. पाठीमागून येणाऱ्या बसमधून प्रवाशांना रवाना केले गेले. दरम्यान, प्रथमदर्शनी ही घटना एसी फ्यूज सर्किट फेल झाल्याने धूर निघाल्याचे समजते.