उत्तर पश्चिममधून काँग्रेसच्या ३६ इच्छुकांमध्ये चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 03:14 AM2019-08-02T03:14:30+5:302019-08-02T03:14:38+5:30

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पदाधिकारी सुनील कुमरे, ताज मोहम्मद शेख

Six of the congressmen from the North West are silent | उत्तर पश्चिममधून काँग्रेसच्या ३६ इच्छुकांमध्ये चुरस

उत्तर पश्चिममधून काँग्रेसच्या ३६ इच्छुकांमध्ये चुरस

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर 

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी उत्तर पश्चिममधून काँग्रेसचे ३६ इच्छुक असून वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त १४ इच्छुक आहेत. दादरच्या टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने बुधवारी उतर मध्य, उत्तर पश्चिम तर उत्तर पूर्व या तीन लोकसभा मतदारसंघांतील १८ विधानसभानिहाय उमेदवारांच्या मुलाखती माणिकराव ठाकरे व हर्षवर्धन पाटील यांनी घेतल्या. या वेळी इच्छुक उमेदवारांना तुमची माहिती सांगा, मतदारसंघातील तुमचा जनसंपर्क कसा आहे, लोकसभा निवडणुकीतील लीड कसा भरून काढणार, मतदारसंघात कोणते उपक्रम राबवता अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक इच्छुकांच्या मुलाखती ३ ते ५ मिनिटांत पूर्ण झाल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पदाधिकारी सुनील कुमरे, ताज मोहम्मद शेख, भरतकुमार सोळंकी, पुष्पा भोळे, सुनील चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. सुनील कुमरे हे आदिवासी सेलचे प्रदेश सचिव असून ते या सेलचे मुंबई अध्यक्ष आहेत.
दिंडोशी मतदारसंघातून चंद्रशेखर दुबे, राजेंद्रप्रताप पांडे, संतोष सिंग, वीरेंद्र सिंग, संदीप सिंग, राकेश यादव, प्रेमभाई गाला इच्छुक आहेत. येथील शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मतदारसंघाची मजबूत बांधणी केल्याने त्यांना टक्कर देण्यासाठी उत्तर भारतीय उमेदवार येथून उभा करावा, अशी चर्चा येथे आहे. गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र सिंग, किरण पटेल, माधवी राणे, प्रवीण नायक व सूर्यकांत मिश्रा हे इच्छुक आहेत. महिला व बाल कल्याण राज्यमंत्री व गोरेगावच्या स्थानिक आमदार विद्या ठाकूर यांच्या विरोधात चांगला उमेदवार द्यावा, अशी मागणी आहे.

वर्सोव्यातून चक्क १४ काँग्रेसचे पदाधिकारी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यामध्ये माजी आमदार बलदेव खोसा, महेश मलिक, डॉ. सिद्धार्थ खोसा, रईस लष्करिया, चंगेज मुलतानी, मोहसिन हैदर, किरण कपूर, भावना जैन, अखिलेश यादव, इष्टीक जांगीरदार, झिशन सिद्दिकी, जावेद श्रॉफ, परमजीत गब्बर, अब्दुल खान यांचा समावेश आहे. वर्सोवा येथून महेश मलिक, रईस लष्करिया, चंगेज मुलतानी, किरण कपूर, भावना जैन, माजी आमदार बलदेव खोसा यांची नावे चर्चेत आहेत. या दिग्गजांचा थेट दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी संपर्क असल्याने ते दिल्लीतून तिकीट मिळवू शकतात, अशी चर्चा आहे. सुमारे २ लाख ९७ हजार मतदार येथे असून सुमारे १ लाख ५ हजार अल्पसंख्याक या मतदारसंघात आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक इच्छुकांना येथून तिकीट मिळाले पाहिजे, अशी समाज बांधवांची इच्छा आहे. त्यामुळे चार वेळा आमदारपद भूषविलेले माजी आमदार बलदेव खोसा यांच्या ऐवजी भाजपच्या स्थानिक आमदार भारती लव्हेकर यांची अल्पसंख्याक समाजात जानपहचान असून त्यांना टक्कर देणारा अल्पसंख्याक चेहरा येथून उभा करावा, अशी चर्चा आहे.
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अशोक जाधव, मोहसिन हैदर व भरत कुमार सोळंकी यांचा समावेश आहे. भाजपचे विद्यमान आमदार अमित साटम यांचा मतदारसंघातील जनसंपर्क व कामाचा आवाका बघता त्यांच्या विरोधात अनुभवी माजी आमदार अशोक जाधव व मोहसिन हैदर यांच्यात तिकिटासाठी चुरस आहे.

अंधेरी पूर्वमधून एकच अर्ज
च्अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून संदीप वाल्मीकी या एकमेव इच्छुकाने अर्ज सादर केला आहे. मात्र माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी व माजी उपमहापौर राजेश शर्मा यांची नावे या इच्छुकांच्या यादीत नसल्याने काँग्रेसमध्ये चर्चा रंगली आहे.

Web Title: Six of the congressmen from the North West are silent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.