शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 07:30 IST2025-07-02T07:30:38+5:302025-07-02T07:30:54+5:30

घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याची कबुली

SIT inquiry to be conducted in 3 months on Shalarth ID; Education Minister Dada Bhuse | शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती

शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती

मुंबई : शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती राज्यव्यापी असल्याची कबुली देत या घोटाळ्याची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल आणि या एसआयटीमध्ये वरिष्ठ आयएएस, आयपीएस तसेच कायद्याचे ज्ञान असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

भाजपचे प्रवीण दटके यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या घोटाळ्यात एकट्या नागपूर विभागामध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला, राज्याचा आकडा फार मोठा आहे, असे सांगत प्रवीण दटके यांनी २०१२ पासून अनेक अपात्र शिक्षकांनी पगारापोटी कोट्यवधी रुपये सरकारचे घेतले, असा आरोप केला आहे.

‘तुमच्या नाकाखालीच घोटाळे होत आहेत’

मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी मंत्री भुसे ज्या जिल्ह्याचे आहेत त्या नाशिकमध्येच शालार्थ आयडी घोटाळे झाल्याचा आरोप केला. तुमच्या नाकाखालीच घोटाळे होत आहेत. काही अधिकारी वर्षानुवर्षे जिल्ह्यातच ठाण मांडून आहेत, असे ते म्हणाले. मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या आरोपांची चौकशी सुरू आहे, सरकारला फसविणाऱ्यांकडून वसुली होईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.

आतापर्यंत १९ जणांवर दाखल झाले गुन्हे 

भाजपचे प्रशांत बंब यांनी या घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी केली. या  घोटाळ्यात आतापर्यंत १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घोटाळ्यात सामील असलेले शिक्षण संस्थाचालक, अधिकारी, शिक्षक कोणालाही सोडले जाणार नाही, सरकारचा पैसा लाटणाऱ्यांकडून तो वसूल केला जाईल, अशी ग्वाही मंत्री भुसे यांनी दिली.

शिंदेसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा जिल्ह्यात झालेल्या या घोटाळ्याकडे लक्ष वेधत सरकार घोटाळेबाज अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे का, असा सवाल केला. काशिनाथ दाते यांनी घोटाळ्याची रक्कम आरोपींकडून वसूल करण्याची मागणी केली.

Web Title: SIT inquiry to be conducted in 3 months on Shalarth ID; Education Minister Dada Bhuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.