Mumbai Crime: धारावीत बहिणीच्या प्रियकराची हत्या, कारखान्यात थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 09:33 IST2025-10-10T09:33:26+5:302025-10-10T09:33:33+5:30
Mumbai Crime: घटनेची वर्दी लागताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

Mumbai Crime: धारावीत बहिणीच्या प्रियकराची हत्या, कारखान्यात थरार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून आरोपीने धारावीतील पुनावाला चाळ येथील एका गारमेंट कारखान्यात २३ वर्षीय तरुणाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत साहिल दिनेशकुमार शर्मा (२२) याला अटक केली आहे.
अरमान शहा (२३) असे मृताचे नाव असून, तो पुनावाला चाळ येथील एका कारखान्यात काम करत होता. त्याचे शर्माच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास शर्मा हा अरमान काम करत असलेल्या कारखान्यात आला. त्याने अरमानशी बोलण्याचा बहाणा करत खिशातून मिरची पावडर काढून त्याच्या डोळ्यात फेकली. त्यानंतर, जवळील चाकूने त्याच्या पोटावर वार केले. मदतीसाठी पुढे आलेल्या कारखाना मालक अश्रफ मोहम्मद मतीन शेख (३८) यांच्यावर देखील हल्ला चढवला. यात शहाचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला. घटनेची वर्दी लागताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
आरोपी जाळ्यात
आरोपी कोणताही मोबाइल फोन वापरत नसल्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी गुप्त बातमीदारांची मदत घेऊन त्याचा शोध घेतला.
गुन्हे शाखेच्या कक्ष ५ चे पोलिस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला राजीव गांधी नगर परिसरातून ताब्यात घेतले.